मुंबई : २०२५ च्या FIDE महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोनेरू हम्पी vs दिव्या देशमुख या दोन भारतीय बुद्धिबळपटू एकमेकांसमोर आल्या असून यानिमित्ताने एक इतिहास घडला आहे. महिला गटात भारताचे हे पहिलेच विश्वचषक विजेतेपद असेल. कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या दोघींनी त्यांच्या चिनी प्रतिस्पर्ध्यांना हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला आणि विजेतेपदाची लढत निश्चित केली.
उपांत्य फेरीत दिव्या देशमुखने तिच्या चिनी प्रतिस्पर्धी टॅन झोंगी हिला १.५-०.५ ने हरवले तर कोनेरू हम्पीने लेई टिंगजी हिला ५-३ च्या फरकाने हरवले. २०२५ च्या FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय बुद्धिबळासाठी एक ऐतिहासिक नवा अध्याय आहे, कारण आज बटुमीमध्ये ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीचा सामना किशोरवयीन खेळाडू दिव्या देशमुखशी होत आहे.
३८ वर्षीय कोनेरू हम्पी हिच्याकडे दिर्घ अनुभव आहे, तिने अलीकडेच जागतिक महिला रॅपिड विजेतेपद जिंकले आहे आणि जागतिक स्तरावर सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. चीनच्या लेई टिंगजीविरुद्ध टाय-ब्रेकमध्ये जोरदार विजय मिळवून हम्पीने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. तर दुसरीकडे, १९ वर्षीय दिव्या देशमुखने आपल्या खेळाच्या जोरावर माजी विश्वविजेत्या झोंगी टॅनसह अव्वल मानांकित खेळाडूंना मागे टाकून तिचे स्थान मिळवले आहे.
त्यामुळे या स्पर्धेत भारतीय खेळाडूचा विजय निश्चित झाला आहे. मात्र आता लक्ष आहे ते दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यातील खेळाकडे. तुम्हाला काय वाटते, कोण विजयी होणार?