वडोदरा : पूल कोसळून आठ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुजरातमधील बडोद्यात घडली आहे. या घटनेत १० जण जखमी झाले असून त्यापैकी काही जणांची प्रकृती अत्यंत गंभीर मानली जात आहे. महिसागर नदीवरील गंभीरा भागात पुलाचा काही भाग कोसळला आणि त्यात हे मृत्यू झाले, अशी माहिती बडोगा ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी दिली. यानंतर बडोद्याचे खासदार मितेश पटेल यांनीही तातडीने घटनास्थळी भेट दिली.
सौराष्ट्र आणि मध्य गुजरात यांना जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा भाग होता, ज्यावर ही घटना घडली. प्रचंड वर्दळ असलेलं हे ठिकाण आहे आणि त्यामुळेच आतापर्यंत आठ मृत्यू झाल्याची खात्री पोलिसांकडून करण्यात आली आहे आणि तीन मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यातही आले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आलंय.
बुधवारी सकाळी जेव्हा ही घटना घडली तेव्हा या पुलावरुन काही वाहनेही जात होती. यापैकी तीन वाहने पाण्यात कोसळली, ज्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. दुर्घटनाग्रस्त पूल हा वडोदरा शहरापासून २५ किमी अंतरावर आहे आणि सौराष्ट्रला जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग मानला जातो. जड आणि अवजड वाहनेही याच पुलावरुन कायम प्रवास करतात. कोसळलेला पूल हा ४५ वर्षे जुना असल्याची माहिती आहे.
sw80bd