मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी कडून पराभूत झालेले उमेदवार महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या गटांमध्ये पक्षप्रवेश करत राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहेत. काँग्रेस पक्षासाठी अशीच एक धक्कादायक बातमी मराठवाड्यातून येत आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, परभणीचे माजी खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात काही काळ कृषी राज्यमंत्री म्हणून काम केलेले सुरेश अंबादास वरपूडकर हे काँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. कारण आज 19 जुलै रोजी सुरेश वरपूडकर यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट घेऊन भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करणार असल्याचे निश्चित केल्याचं सांगण्यात येत आहे.
काँग्रेसचे जिल्हाप्रमुख असलेले सुरेश वरपूडकर यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राजेश विटेकर यांच्याकडून पराभव झाला आहे. तर वरपूडकर यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार मोहन फड यांचा पराभव करून विजय मिळवला होता. तर सुरेश वरपुडकर यांनी 2008-09 मध्ये तत्कालीन काँग्रेसच्या सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून देखील काम केलं आहे. तर त्याआधी जिल्ह्याचे खासदार म्हणून देखील निवडून आले होते. आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत काँग्रेस पक्षाशी मराठवाड्यातील एकनिष्ठ नेता म्हणून त्यांची ओळख होती. परंतु बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार वरपूडकर यांनी भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश चे निश्चित केल्याची माहिती मिळत आहे. हा प्रवेश अंदाजे २४ जुलै च्या आसपास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईत आज झालेल्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे आणि सुरेश वरपूडकर यांची भेट झाली. यावेळी त्यांच्यासोबत परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, भाजपचे नवीन जिल्हाप्रमुख सुरेश भुमरे, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान सानप, वसंत शिंदे आणि गोविंद दायमा हे देखील उपस्थित होते. यावेळी विविध विषयावर चर्चा झाल्याची शक्यता असून सुरेश वरपूडकर यांचा पक्षप्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.
यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी मोठी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.