पुणे : जेजुरी गडाजवळ झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात महिलेसह सात जणांचा मृत्यू झालाय, तर पाच जण जखमीही झाले आहेत. जेजुरी मोरगाव रस्त्यावर झालेल्या या अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि पोलिसांनी याची माहिती दिली, शिवाय रुग्णवाहिकेलाही तातडीने फोन लावला गेला.
मोरगाव रस्त्यावर श्रीराम हॉटेलमध्ये पिकअपमधून सामान उतरवण्याचं काम सुरु होतं. याचवेळी भरधाव वेगात आलेली स्विफ्ट कार पिकअपला जोरदार धडकली आणि त्यामुळेच हा अपघात झाला. इंदापूरच्या दिशेने जात असलेल्या स्विफ्टमधील पाच जणांचा आणि टेम्पोमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. साहित्य उतरवण्यासाठी मदत करत असलेल्यापैकीही काही जणांसह एकूण पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.