Jayashree Patil | जयश्री पाटलांचा काँग्रेसला दे धक्का, भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला

jayashree patil sangli

Jayashree Patil | सांगली जिल्ह्यात दिवंगत नेते मदन पाटील गटाची मोठी ताकद आजही आहे आणि या गटाची मदार जयश्री पाटील (Jayashree Patil) यांच्यावर आहे. मात्र जयश्री पाटील यांनी ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. वसंत दादा पाटलांच्या नातसून असलेल्या जयश्री पाटील या बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पाटील गटाला आपल्याला डावललं जात असल्याची सतत भावना मनात निर्माण झाली होती आणि त्यातूनच जयश्री पाटील यांनी ही निर्णय घेतल्याचं कार्यकर्ते सांगतात.

कोण आहेत जयश्री पाटील? (Jayashree Patil)

जयश्री पाटील यांचं माहेर ठाणे जिल्ह्यातलं असून त्या सध्या सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष आहेत. अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्या त्या वहिनी आहेत आणि मदन पाटील यांच्या निधनानंतर त्यांनी पाटील गटाची सूत्र हातात घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी सांगली पॅटर्न राज्यभर गाजला होता आणि जयश्री पाटील यांनी विशाल पाटील यांच्यासाठी प्रचारही केला होता. काँग्रेसमध्ये असूनही पक्षाच्या विरोधात जयश्री पाटील यांनी प्रचार केल्याने त्यांच्यावर कारवाई होईल का याकडेही लक्ष लागलं होतं. मात्र सांगली जिल्ह्यातील पूर्ण गटानेच विशाल पाटील यांच्यासाठी ताकद लावली होती.

लोकसभा निवडणुकीपासून धुसफूस

वसंत दादा घराण्याचा वारसा असलेल्या जयश्री पाटील यांना विधानसभेतही सांगली विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आलं होतं. खरं तर तेव्हापासूनच पाटील गटात टोकाची नाराजी होती आणि भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता. अखेर जयश्री पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला. दुसरीकडे विशाल पाटील यांना सुद्धा अनेकदा भाजपने खुली ऑफर दिली आहे आणि विशाल पाटील यांनीही काँग्रेससोबत किती दिवस राहणार याबाबत कोणतीही ठोस भूमिका जाहिर केलेली नाही. सांगलीचं राजकारण आणि वसंत दादा पाटील घराणं हे एक मोठं समीकरण आहे. सांगलीत वसंत दादांच्या कुटुंबाने आतापर्यंत १६ निवडणुका जिंकल्यात, ज्यातल्या सहा निवडणुका स्वतः वसंत दादांच्या काळातच जिंकल्या. १९८० ला वसंत दादांनी इंदिरा गांधींच्या आग्रहाखातर निवडणूक लढवली होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *