नंदुरबार, प्रितम निकम : रस्ता नसल्याने सर्पदंश झालेल्या आदिवासी रुग्णाचा बांबूच्या झोळीतून जीवणघेणा प्रवास नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात एका आदिवासी नागरिकाला सर्पदंश झाल्यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी रस्ता नसल्याने बांबू झोळीतून 3 किलोमीटरचा जीवघेणा संघर्ष करावा लागल्याची घटना घडली आहे.
अक्राणी तालुक्यातील मोजरा पाटील पाड्यावरील ३४ वर्षीय शिवलाल वळवी या आदिवासी बांधवाला विषारी सापाचा सर्पदंश झाल्यानंतर नातेवाईकांना रुग्णालयात जाताना प्रचंड हाल झाले. यावेळी गावाला जोडणाऱ्या मोजरा नदीला पूल आणि रस्ता नसल्याने कमरेइतक्या पाण्यातून वाट काढावी लागली.
सर्पदंश झालेल्या आदिवासी बांधवाला धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून रुग्णाची प्रकृती चांगली असल्याची माहिती मिळत आहे. मात्र रस्ता आणि पूल नसल्याने ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.