मुंबई, प्रकाश पाटील (प्रतिनिधी) : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लक्षात घेऊन मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेना यांची औपचारिक युती जाहीर करण्यात आली आहे. आज मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली.
यावेळी आनंदराज आंबेडकर म्हणाले, “ही युती आजची नसून, ही युती प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे म्हणत आंबेडकर यांनी या युतीला वैचारिक पायाभूत आधार दिला.
आंबेडकर यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना म्हटले, “मुख्यमंत्री म्हणून वागताना शिंदे यांनी नेहमी तळागाळातील लोकांसाठी काम केले. त्यांनी बौद्ध समाजातील धर्मगुरूंना घरी बोलावून भोजन दिले, जे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं. आंबेडकरी समाजाने आजपर्यंत रस्त्यावर लढा दिला, पण कार्यकर्त्यांना सत्ता मिळाली नाही. आता सत्तेचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.”
लोकांनी आमचे विचार आणि शिंदे यांचे विचार वेगळे असल्याचे म्हटले, यावर उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केलं, “या देशात प्रत्येक माणूस बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवर चालतो. त्यामुळे विचार वेगळे असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. युतीमध्ये कोणतीही अट नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये सामावून घेण्याचा शिंदे यांनी शब्द दिला आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपली भावना व्यक्त करताना म्हटले, “शिवसेना आणि रिपब्लिकन सेना दोघेही ‘सेना’ आहेत—एक बाळासाहेबांच्या विचारांची, दुसरी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची. दोघीही अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या सेना आहेत. त्यामुळे आमचं उत्तम जुळून येईल. आनंदराज आंबेडकर यांचा स्वभाव आणि तळमळ सामान्य माणसासाठी आहे, आणि माझाही स्वभाव तसाच असल्याचं सांगताना शिंदे यांनी सांगितले की, सामान्य कार्यकर्त्यांना न्याय आणि जनसेवेची संधी मिळावी, हीच आमची भूमिका आहे.” काही ठिकाणी संविधान धोक्यात असल्याची चर्चा झाली, यावरही त्यांनी उत्तर दिलं, “संविधान कधीच धोक्यात नव्हतं, मात्र काही मंडळींनी फेक नॅरेटिव्ह तयार केला. पण आमचा विश्वास संविधानावर असून, आम्ही त्याचे रक्षणकर्ते आहोत. जब तक सूरज चांद रहेगा, तब तक बाबासाहेब का संविधान रहेगा असेही शिंदे म्हणाले.
या ऐतिहासिक युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. विशेषतः ग्रामीण व दलित मतदारांमध्ये ही युती प्रभाव टाकेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. ही युती केवळ राजकीय नसून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने उचललेलं महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असं दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं.