मुंबई : विधान भवन परिसरात पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत जे दोन नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले होते त्यातील जितेंद्र आव्हाड यांचा तो कार्यकर्ता कोण आणि झालेली घटना का घडली याची माहिती घेऊ.
आजच्या या घटनेचे मूळ कालच्या घटनेत असल्याचे समजत आहे. जितेंद्र आव्हाड यांना काल गोपीचंद पडळकर यांनी ज्यावेळेस शिवीगाळ केली त्यावेळी पडळकर यांना उलट एका व्यक्तीने प्रत्युत्तर दिले होते तो आव्हाडांचा कार्यकर्ता होता. काल त्या आव्हाडांच्या कार्यकर्त्याने पडळकर यांचा उद्धार करत अर्वाच्य भाषेत बोलला होता. त्याच कार्यकर्त्याला आज गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी शोधून विधान भवन परिसरात येऊन उत्तर दिले असल्याचे समजत आहे.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना अचानक आज 17 जुलै रोजी सायंकाळी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचा जो कार्यकर्ता आहे त्याचे नाव नितीन देशमुख आहे. नितीन देशमुख हे अनेक दिवसांपासून राजकारणात सक्रिय असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता असल्याची माहिती मिळत आहे. देशमुख हे मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट प्रभाग क्रमांक 124 मध्ये सक्रिय काम करतात आणि ते आव्हाडांचे कट्टर कार्यकर्ता आहेत.
काल झालेल्या पडळकर आणि आव्हाड यांच्या शिवीगाळ प्रकरणावेळी नितीन देशमुखही तिथे असल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी पडळकर यांनी आव्हाड यांना शिवीगाळ केली त्यावेळी देशमुख यांनी प्रतिउत्तर दिल्याचा दावा करण्यात येत आहे. देशमुख यांनी पडळकर यांना अर्वाच्य भाषेत उद्धार केला होता. तसेच कालच्या प्रकरणानंतर देशमुख यांनी पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खुले आव्हान देखील दिलं होतं आणि हेच कारण आजच्या वादाला कारणीभूत ठरलं असल्याची शक्यता आहे.