मुंबई : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद दोन दिवसांपासून पाहायला मिळत आहे. काल १६ जुलै रोजी झालेली शिवीगाळ चर्चेत असताना आज १७ जुलै रोजी सायंकाळी दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये विधानभवनाच्या लॉबीमध्येच हाणामारी झाली आहे.
नेमकं काय घडलं?
सायंकाळी आज विधानभवनाच्या लॉबीमध्ये नेहमी प्रमाणे सगळे जमलेले असताना पडळकर आणि आव्हाड समर्थकही तेथे जमले आणि दोन्ही गटामध्ये जोरदार हाणामारी झाली. तिथे जमलेल्या इतर लोकांनी ताबडतोब मध्यस्थी करत होत असलेला राडा थांबविला.
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर यांच्यावर गंभीर आरोप करत मला मारण्यासाठी विधानभवनात गुंड आणले होते, मात्र त्यांनी मला न मारता माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला असल्याचे सांगितले. दरम्यान आता आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याने हे प्रकरण आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.