आजोबा आणि वडिलांच्या प्रभावी राजकारणाची परंपरा, स्वतःला संधी मिळाल्यानतंर पहिल्याच निवडणुकीत लोकसभा गाठली, पाच वर्ष कामंही केली, पण ऐन निवडणुकीच्या काळात एका छोटाशा कारणावरुन पराभव झाला आणि सुजय विखे यांच्या राजकीय कारकिर्दीतला त्यांना पहिला धक्का बसला. पराभवानंतर सुजय विखेंनी आपलं कुठे काय चुकलं, कुणी साथ सोडली, कुणी दगाफटका केला सगळं आकलन केलं आणि हिशोब चुकता करण्यासाठी ते पुढच्या संधीची वाट पाहत राहिले.. लोकसभेच्या निकालानंतर सुजय विखेंना पहिली संधी संगमनेर मतदारसंघात मिळाली. नवख्या उमेदवाराला विखेंनी निवडून आणलं आणि बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला ध्वस्त केला.. संगमनेरची निवडणूक स्वतः सुजय विखेंनी हातात घेतली होती आणि थोरातांवर ते भारीही पडले. आणखी एक हिशोब चुकता करण्याची दुसरीही संधी जवळपास बारा महिन्यांनी मिळाली आणि तीही निलेश लंके यांना साथ देणाऱ्याचा कार्यक्रम करण्यासाठीच.. ज्या व्यक्तीने विधानसभेत भाजपचं काम केलं, पण लोकसभेत सुजय विखेंना विरोध केला अशा व्यक्तीचा एका स्थानिक निवडणुकीत सुजय विखेंनी असा कार्यक्रम लावलाय ज्यात फक्त लंकेंना साथ देणारा नेताच नव्हे, तर त्याच्या अख्ख्या पॅनलचाच सुपडासाफ झाला. ही स्टोरी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी कारखान्याच्या निवडणुकीची.. ही निवडणूक जरी फक्त एका कारखान्याची असली तरी यात जुने हिशोब चुकते झालेत आणि अत्यंत संयमाने पराभव पचवलेल्या सुजय विखेंनी पुन्हा राजकीय एंट्री कशी केलीय त्याचीच स्टोरी मी तुम्हाला या व्हिडीओत सांगणार आहे…
राहुरी कारखान्याच्या निवडणुकीत प्राजक्त तनपुरे विरुद्ध राजू शेटे यांच्या पॅनलची लढत होती. राजू शेटे यांची एक संघटना आहे आणि त्यामार्फ ते स्थानिक पातळीवर काम करतात. लोकसभा असो किंवा विधानसभा, पाच ते दहा हजार मतं मिळवून देण्याची राजू शेटेंकडे ताकद आहे हे सगळ्या उमेदवारांना माहित असतं म्हणून निवडणुकीत त्यांचं कायम महत्त्व वाढतं. गोष्ट गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीची आहे. सुजय विखेंसाठी वातावरण अत्यंत आव्हानात्मक बनलं होतं आणि स्थानिक पातळीवर विखेंनी सगळी ताकद लावून संघटन केलं तरीही ज्या काही लोकांनी विरोध केला त्यापैकी एक होते ते राजू शेटे.. तिकडे संगमनेरच्या बाळासाहेब थोरातांनी अहिल्यानगरमध्येही त्यांची यंत्रणा कामाला लावली आणि लंकेंना मदत केली. तसंच राजू शेटेंनीही निलेश लंकेंनी सुजय विखेंच्या विरोधात काम केलं, ज्याचा काही प्रमाणात फटकाही विखेंना बसला. 2019 ला सुजय विखे अहिल्यानगरमधून २ लाख ८१ हजार मतांनी विजयी झाले होते आणि त्यानंतर दुसऱ्याही टर्ममध्ये कामाच्या आधारावर सहज विजय मिळवू अशी त्यांना खात्री होती. पण २०२४ च्या निवडणुकीत सुजय विखेंचा फक्त २८ हजार मतांनी पराभव झाला आणि पहिल्यांदाच लोकसभा लढलेले निलेश लंके खासदार झाले. ऐन निवडणुकीत समोर आलेला कांदा प्रश्न आणि लंकेंना त्यांची प्रतिमा एक साधारण कार्यकर्ता अशी प्रतिमा तयार करण्यात मिळालेलं यश या कारणांमुळे सुजय विखेंचा निसटता पराभव झाला. या पराभवात योगदान देणाऱ्या बाळासाहेब थोरातांचा बदला सुजय विखेंनी संगमनेरमध्ये जाऊन घेतला. असं सांगितलं जातं की निलेश लंकेंच्या मदतीसाठी सगळी यंत्रणा बाळासाहेब थोरातांनी पाठवली होती आणि थोरातांच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनाही लंकेंचं काम करण्याचे आदेश होते. सुजय विखेंनी पराभवानंतर संगमनेर विधानसभेची सूत्र हातात घेतली आणि लढण्याची इच्छाही बोलून दाखवली. पण मतदारसंघ महायुतीत शिवसेनेला सुटला आणि तिथेही विखे समर्थक अमोल खताळ यांना उतरवण्यात आलं. गरीब विरुद्ध श्रीमंत उमेदवार हे जे चित्र अहिल्यानगर मतदारसंघात २०२४ ला लोकसभेत उभं करण्यात आलं होतं तसंच चित्र संगमनेर विधानसभेतही तयार झालं आणि संगमनेरकरांनी आठ वेळा आमदार असलेल्या बाळासाहेब थोरातांना घरी बसवलं. सुजय विखेंनी जशास तसा बदला घेऊन पहिला हिशोब पूर्ण केला. सुजय विखेंना विरोध करणारं दुसरं नाव होतं राजू शेटे.. विखे कुटुंबाने राजू शेटे यांची कधी फारशी दखल घेतली नसली तरी लोकसभेला त्यांनी लंकेंना मदत केली होती हे सुजय विखेंच्या यावेळी पक्क ध्यानात होतं. राहुरी कारखान्याच्या निवडणुकीत सुजय विखेंनी जरी थेट कुणाच्याही बाजूना उभा राहण्याची घोषणा केलेली नसली तरी शेतकऱ्यांना एक आवाहन केलं की तुमची जे काळजी घेतील त्यांना तुम्ही साथ द्या. हा मेसेज क्लिअर होता की तनपुरेंच्या मागे उभा रहायचंय. शेतकऱ्यांनी तनपुरेंच्या पॅनलला एवढी भरभरुन मतं दिली की राजू शेटे यांच्या पॅनलचा एकही सदस्य निवडून आला नाही. राजू शेटे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय आणि एकनाथ शिंदे यांना भेटून कारखान्याच्या निवडणुकीत विजयासाठी मदतही मागितली होती. भरत गोगावले हे स्वतः या कारखाना निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार होते, मात्र त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. खरं तर या कारखान्यावर गेल्या अनेक वर्षांपासून तनपुरे गटाचं वर्चस्व आहे आणि या भागातल्या सहकारातही तनपुरेंचं संघटन मजबूत मानलं जातं. याचाच या निवडणुकीतही तनपुरेंना फायदा झाला. राजू शेटेंनी भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले आणि शिवसेनेच्या बळावर निवडणूक जिंकता येईल असं नियोजन केलंहोतं. कारण, शिवाजी कर्डिलेंना राजू शेटेंनी विधानसभा निवडणुकीत मदत केली होती. पण शिवाजी कर्डिले यांचं सहकार क्षेत्रातलं संघटन जवळपास नसल्यात जमा आहे आणि त्याविरुद्ध विखे यांचं संघटन मात्र मजबूत आहे. खरं तर प्राजक्त तनपुरे हे सुद्धा सुजय विखे यांचे विरोधक आहेत, मात्र या कारखान्याच्या निवडणुकीत शेटे यांच्यापेक्षा तनपुरे कधीही चांगले अशी परिस्थिती होती. स्थानिक पातळीवर भाजपातच दोन गट होते आणि कर्डिलेंचा गट म्हणावा तसा ग्राऊंडवर सक्रिय दिसत नव्हता.
खरं तर सुजय विखेंनी या निवडणुकीत कोणतीही भूमिका घेतली नव्हती, पण त्यांचं एक आवाहन राजू शेटे यांना महागात पडलं. निवडणुकीपूर्वी शिवसेनेची आणि कर्डिलेंचीही साथ मिळेल असं दिसत होतं, मात्र प्रत्यक्षात निवडणुकीत अनपेक्षित धक्का राजू शेटेंना बसला. राजू शेटे यांनी लोकसभेत निलेश लंकेंसाठी जे काम केलं त्याचा हा परिणाम होता, असंही काही शेतकरी म्हणाले. सुजय विखे सध्या खासदार नसले तरी स्थानिक राजकारणात ते सक्रिय आहेत आणि येत्या काळात ज्या जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्यापूर्वी कारखान्याच्या निवडणुकीने वातावरण ढवळून काढलंय. लोकसभेत फक्त २८ हजार मतांनी झालेला पराभव सुजय विखेंच्या जिव्हारी लागला होता आणि त्यानंतर लोकांमध्ये जाऊन काम करण्यासाठी सुजय विखेंनी सुरुवात केली. लोकसभेच्या आधी सुजय विखेंवर टीका व्हायची की ते लोकांच्या संपर्कात नसतात, पण पराभवानंतर त्यांनी मतदारसंघातल्या घरगुती कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा सपाटाच सुरु केला. राहुरी कारखान्याचा निकाल आणि सुजय विखे यांची भूमिका.. यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरुर लिहा…