५ लाख अंडी, १५ हजार लीटर दूध, दिवसाला ५० लाखांची उलाढाल करणारं गाव कसं आहे?

Chincholi Gurav Village Story

अहिल्यानगर : ज्या भागात शेतीसाठी पाणी नाही तिथल्या शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी एकतर ऊसतोड करावी लागते किंवा शहरात जाऊन काही तरी व्यवसाय, नोकरी शोधावी लागते. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव, देवकोठे या गावातील शेतकऱ्यांनी अवर्षणावर जो मार्ग काढलाय तो कदाचित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरु शकतो. या गावात आजघडीला कुक्कुटपालनातून दररोज ५ लाख अंड्यांची निर्यात होते आणि १५ हजार लीटर दुधाचं संकलन होतं. ही साधारण ५० लाखांची दैनंदिन उलाढाल आहे. या गावातल्या शेतकऱ्यांनी यातून उन्नती कशी साधलीय तेच तुम्हाला या बातमीत वाचायला मिळणार आहे आणि बातमीच्या खालील व्हिडीओत तुम्ही संपूर्ण गावाची स्टोरीही पाहू शकता

IMG 0918

२००५ ला प्रयोग आणि नशिब बदललं

गावातील एका शेतकऱ्याने २००५ ला कुक्कुटपालनाचा पहिला प्रयोग केला आणि त्यानंतर गावाला समजायला लागलं की यातून उदरनिर्वाह भागू शकतो. चिंचोलीतील दादा आबाळे यांनी पहिला फार्म सुरु केला आणि अंड्यांची विक्री जोरदार होऊ लागली. आजघडीला त्यांच्या फार्ममधून दररोज एक लाख अंड्यांची विक्री होती. शेतकऱ्यांना चांगला नफा देणारा व्यवसाय म्हणून याकडे पाहिलं जातं. कारण, शेतकऱ्यांच्या पिकांचा भाव पाहिला तर शेतात १० रुपयांनी मिळणारा भाजीपाला शहरात ५० रुपयांना मिळतो. मात्र अंड्यांच्या बाबतीत असं नाही. चिंचोलीतील फार्मवर मिळणाऱ्या एका अंड्याचा दर हा साधारण ५ रुपये ७० पैशापर्यंत आहे. शहरात ही अंडी ६ ते ७ रुपये नगाने विकली जातात. म्हणजे शेतकऱ्याचा दर आणि शहरात मिळणारी अंडी यात फारसा फरक नाही.

IMG 0921

या गावातल्या बहुतांश शेतकऱ्यांनी आठ ते १० हजार कोंबड्या असलेले फार्म सुरु केले आहेत, ज्यातून दिवसाला सहज १० ते २० हजार अंड्यांची विक्री केली जाते. यातून मिळणारा पैसा जरी मोठा दिसत असला तरी उन्हाळ्यात होणारं नुकसानही तेवढंच असतं आणि यातली गुंतवणूकही तेवढीच मोठी आहे, असं शेतकरी सांगतात.

IMG 0920

१५ हजार लीटर दुधाचं संकलन

दुधातूनही शेतकऱ्यांनी किमया साधली

या गावात खरं तर निळवंडेचं पाणी येण्याच्या आधी प्रचंड दुष्काळी परिस्थिती होती. निळवंडेचं पाणी आल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटलाय. त्यामुळे दुधाचा व्यवसायही तेजीत आहे. दररोज १२० लिटर दुध विकणाऱ्या एका शेतकऱ्याने सांगितलं की, शेतीतून फारसं उत्पन्न नाही मात्र दुधातून नफा चांगला मिळतो. खाद्य आणि चारा यांचा खर्च वगळता यात आपली स्वतःची मेहनत हीच गुंतवणूक आहे.

गावकऱ्यांची स्टोरी – व्हिडीओ पाहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *