नंदुरबार (प्रितम निकम) : नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील गमनचा पांगरपाडा येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्याच प्रियकराने मित्रांच्या मदतीने विष पाजून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एखाद्या गुन्हेगारी चित्रपटातील थरारनाट्याला साजेसा हा प्रकार घडला असून, यामुळे सातपुड्यातील दुर्गम भाग असलेला नंदुरबार जिल्हा हादरला आहे.
जवळपास तीन महिन्यांपूर्वी ही अल्पवयीन मुलगी आपल्या प्रियकरासोबत घरातून पळून गेली होती. त्यानंतर, प्रियकराने तिला तीन महिन्यांनी परत तिच्या घरी आणून सोडले. इतकेच नाही, तर त्याने तिला पुन्हा कधीही आपल्या जवळ न येण्याची ताकीदही दिली होती.
त्यानंतर प्रियकराने आपल्या काही मित्रांसोबत आपल्या प्रेयसीचे पुन्हा घर गाठलं आणि ती झोपेत असतानाच त्याने तिला जबरदस्तीने विष पाजून ठार केले. या क्रूर आणि अमानुष घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मोलगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी प्रियकरासह 3 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, हत्येमागील नेमकं कारण काय होतं आणि प्रियकराने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.