मुंबई : भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुलगा सागर धसच्या (Sagar Dhas Accident) अपघातावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुलगा सागर हा उपचारासाठी दादरमधील साबळे या डॉक्टरकडे येत होता, त्याची ही नियमित ट्रिटमेंट आहे, मात्र दुर्दैवाने अहिल्यानगर-पुणे मार्गावरील जातेगाव फाट्याजवळ हा अपघात झाला, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली. सोशल मीडियावरुन होणारी टीका आणि आरोपांना सुद्धा सुरेश धस यांनी उत्तर दिलं आहे.
सागर धसकडून पुण्याच्या दिशेने येत असताना सुप्यापासून काही अंतरावर असलेल्या जातेगाव फाट्यावर एका दुचाकीस्वाराला उडवण्यात आलं. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी सागर धसवर गुन्हा दाखल करुन अटकेचीही कारवाई केली. या सगळ्या प्रकरणावर पहिल्यांदाच सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकरण दाबल्याचा आरोप, सुरेश धस काय म्हणाले?
सागर धसकडून झालेला अपघात मॅनेज करण्यात आल्याचा आरोप सुरेश धस यांच्यावर होतोय. याला उत्तर देताना सुरेश धस म्हणाले की, अपघात हा अपघात असतो. त्यात आरोप आणि प्रत्यारोप करण्याचं काहीही कारण नाही. सागर हा मुंबईला नियमित उपचारासाठी येत होता. साडे नऊ वाजता सोमवारी रात्री तो घरुन निघाला आणि साडे दहा वाजताच्या आसपास सुप्याच्या जवळ हा अपघात झाला. अपघातानंतर त्याने स्वतःहून पोलिसांना बोलवून घेतलं. सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक त्यावेळी ऑन ड्युटीच होते आणि त्यांनी तातडीने या अपघाताची नोंद घेतली. सागरने नितीन शेळके यांच्या भावाला फोन करुन बोलवून घेतलं आणि उपचारासाठी नेलं, मात्र त्यापूर्वीच दुर्दैवाने शेळके या तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी सागर आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीचेही रक्ताचे नमुने घेतले आहेत आणि ते तपासासाठी पाठवलेत. या प्रकरणात जे काही असेल त्याची निष्पक्ष चौकशी करायला माझी हरकत नाही, असं सुरेश धस म्हणाले.
धसांच्या मुलावर कारवाई
अपघातानंतर सुरेश धस यांच्या मुलाला चौकशी आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होईपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय पोलिसांनी सागर धस याच्यावर गुन्हाही दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्ताचे नमुनेही घेतले असून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.