मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्याकडे पक्षाची धुरा दिली आहे. मात्र या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका करत शरद पवार कसा जातीयवाद करतात हे स्पष्ट करून सांगितलं आहे.
शरद पवार हे महाराष्ट्राचे नेते असून ते शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार पुढे नेण्याचे काम करतात. मात्र पवारांना त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर एकही दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी समाजातील चेहरा सापडला नाही का? नाव घेताना शाहू, फुले आणि आंबेडकरांचे घ्यायचे. स्वतःला पुरोगामी नेता समजायचे आणि नेतृत्व देताना कारखानदार, स्वतःच्या जातीतील लोकांना महत्वाची पदे द्यायचे धोरण राबवितात. आता तरी हे धोरण राबविण्याचे बंद करा म्हणत लक्ष्मण हाके यांनी पवारांवर टीका केली.
तसेच जयंत पाटील यांच्या जागी नव्या प्रदेशाध्यक्ष पदावर आलेल्या शशिकांत शिंदे यांना शुभेच्छा देत लक्ष्मण हाके यांनी शिंदे यांना विरोधी पक्षाचा नेता म्हणून ओबीसी, दलित, आदिवासी, मुस्लिम यांच्या प्रश्नावर आवाज उठविण्याची विनंती केली.