मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या पक्षाच्या वर्धापनदिनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवल्यामुळे शरद पवार जे निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सांगत वेळ टाळली. मात्र अखेर त्यांनी स्वतःहून आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीच्या नवीन प्रदेशाध्यक्षाचा निर्णय १५ जुलै रोजी पक्षाच्या बैठकीत होणार आहे आणि शशिकांत शिंदे हे या रेसमध्ये सर्वात पुढे आहेत.
जयंत पाटील हे मागील सात वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत होते. प्रदीर्घकाळ एकाच पदावर एकच व्यक्ती असल्याने अनेक वेळा पक्षाच्या अंतर्गत त्यांना विरोध होत होता. त्यामुळे अनेक वादही झाल्याचे सांगण्यात येते. याबरोबरच जयंत पाटील यांनी स्वतः नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी आपल्याला जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यांच्या कार्यकाळात सर्वात मोठी घटना म्हणजे पक्षात पडलेली फूट आणि त्यातून निर्माण झालेले दोन गट होय.
फूट पडून अजित पवार सत्तेत सामील झाले तर स्वतः जयंत पाटील यांनी शरद पवारांसोबत राहणे पसंत केले. अनेक वेळा त्यांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याचाही बातम्या आल्या मात्र त्यांनी आजपर्यंत शरद पवार यांच्या सोबत एकनिष्ठा दाखवली. आगामी काळात जयंत पाटील काय निर्णय घेणार याकडे मात्र सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जयंत पाटील यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती मिळत आहे. १५ जुलै रोजी शशिकांत शिंदे आपल्या नव्या पदाचा पदभार घेतील असेही सांगण्यात येत आहे. मात्र पक्षाकडून अधिकृत आणखी कोणतीही घोषणा जाहीर करण्यात आली नाही.
शशिकांत शिंदेच का?
पवारांसाठी पश्चिम महाराष्ट्रात सातारा हा सर्वात महत्त्वाचा जिल्हा आहे. उदयनराजे भोसले यांना पाडून शरद पवारांचा खासदार निवडून देणारा जिल्हा म्हणून साताऱ्याकडे पाहिलं जातं. सध्या साताऱ्यात पवार गटाची अवस्था फारशी चांगली नाही. लोकसभेत तुतारी या चिन्हाच्या गोंधळामुळे शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. त्यानंतरच्या विधानसभेतही त्यांना आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. साताऱ्यातलं नेतृत्व देऊन पवार एक वेगळा संकेतही देऊ शकतात, शिवाय शशिकांत शिंदे हे पवारांच्या सर्वात विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जातात.