बीड : कोचिंग क्लास मालकाकडून झालेल्या लैंगिक छळ प्रकरणी बीडचं वातावरण तापलंय आणि आता राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर हे त्यांची पत्नी सारिका क्षीरसागर यांच्यासह मैदानात उतरले आहेत. दोघांनीही बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करणार असल्याचं सांगितलं. याशिवाय विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी उमाकिरण क्लासेस व्यवस्थापनाशी संपर्क साधून शैक्षणिक शुल्क परत घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचंही योगेश क्षीरसागर म्हणाले. दुसरीकडे बीड पोलिसांनीही फरार असलेल्या विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांनाही अटक केली आहे.
बीडमधील उमाकिरण कोचिंग क्लासचा मालक विजय पवारने एका १७ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. या घटनेच्या निषेधार्थ बीडमधील सर्वपक्षीय नेेते एकवटले असले तरी आमदार संदिप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. विजय पवार हा गुन्हा दाखल झाल्यानंतरही आमदाराच्या घरी गेला होता, असा आरोप योगेश क्षीरसागर यांनी केला.
योगेश क्षीरसागर काय म्हणाले?
“आज मी स्वतः पोलीस अधीक्षक, पीडितेच्या कुटुंबियांकडून माहिती घेतली आहे. याप्रकरणाची संपूर्ण माहिती महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार साहेबांना संपर्क करून सांगणार आहे. आरोपी विजय पवारचे अनेक घोटाळे, गैरव्यवहार आहेत. विद्यार्थ्यांसह छोट्या मोठ्या क्लासेस चालकांना देखील त्रास दिल्याचे समजत आहे. आरोपी पवारने जमीन घोटाळाही केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, माझे सर्वांना आवाहन आहे की, राजकारण बाजूला ठेवून आरोपी सुटता कामा नये ही भूमिका सर्वांची असायला हवी. उमाकिरण शैक्षणिक संकुलमधील ट्यूशन्स बंद असल्याने हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी या ट्यूशन्सच्या मॅनेजमेंटशी संपर्क करत विद्यार्थ्यांचे पैसे वापस मिळवून त्यांना नवीन ठिकाणी प्रवेश देण्यासाठी मदत करणार आहे. कारण कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये व विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये हा माझा प्रयत्न असेल. या प्रकरणात सखोल माहिती घेतल्यावर समजते की, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी लोकप्रतिनिधीच्या घरी गेले होते, त्यानंतर तो आरोपी फरार झाला. सरकारी यंत्रणेवर दबाव कोणी टाकला याची चौकशी व्हावी व सीसीटीव्ही तपासावेत अशी मागणी असणार आहे,” अशी माहिती पत्रकार परिषदेत योगेश क्षीरसागर यांनी दिली.