बीड : कोचिंग क्लासमधील १७ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी फरार असलेल्या विजय पवारविषयी (Beed Vijay Pawar) बीडचे राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर विजय पवार हा रात्री आमदार संदिप क्षीरसागर यांच्या घरी होता आणि त्याला फरार होण्यासाठी मदत कुठून झालीय, याचा शोध घ्यावा असं आवाहन त्यांनी बीड पोलिसांना केलंय. विजय पवारने फरार होण्याआधी कुणाकुणाला फोन केले त्याची माहिती काढली तर सगळं समोर येईल, असंही योगेश क्षीरसागर म्हणालेत.
विजय पवार हा आमदार संदिप क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याचं योगेश क्षीरसागर म्हणाले. संदिप क्षीरसागर आणि विजय पवार हे किती जवळचे आहेत याचे बरेच फोटोही घटना समोर आल्यापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संदिप क्षीरसागरांसोबत विजय पवार बीडपासून ते विधानभवनापर्यंत सगळीकडे दिसत आहे. कोचिंग क्लासेस चालवत असलेला विजय पवार हा संदिप क्षीरसागरांच्या जवळचा असल्याचा फायदा घेऊन अनेक अधिकाऱ्यांनाही धमकी द्यायचा, अशीही माहिती समोर येत आहे.
प्लॉटिंगची खरेदी आणि विक्री व्यवहारात यापूर्वी विजय पवारही नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयातील एका अधिकाऱ्याला ८० लाखांची खंडणी मागितल्याचाही आरोप झाला होता. मात्र विजय पवारही दहशत असल्यामुळे आणि तो आमदाराचा राईट हँड असल्याने त्याच्याविरोधात कुणीही तक्रार द्यायला पुढे येत नव्हतं.
पालकांकडून धक्कादायक खुलासे
विजय पवार प्रकरणी आता पालकांकडूनही काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. शुक्रवारी रात्री काही पालकांनी क्लासची फी परत मागण्यासाठी उमाकिरण संकुलात गर्दी केली होती. विजय पवार हा फिजिक्स या विषयाची शिकवणी घ्यायचा आणि त्यासाठी एका वर्षाला २२ हजार रुपये एवढी फी होती. मात्र पालकांच्या म्हणण्यानुसार, ज्या मुली गरीब कुटुंबातल्या आहेत आणि त्यांच्या पालकांना कुणाचाही आधार नाही, अशा मुलींनाच विजय पवार वासनांध नजरेने पाहायचा आणि केबिनमध्ये बोलवायचा, असं काही पालकांनी स्टोरी डॉट कॉमला सांगितलं आहे.