बीड : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) दिनांक ३० जून २०२५ रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार ‘समकालीन औषधशास्त्र अभ्यासक्रम’ पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना वैद्यकीय परिषदेत नोंदणी करण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र हा निर्णय सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारा आहे, अशी माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनंत मुळे यांनी दिली.
या निर्णयाचा निषेध करताना आयएमएचे सचिव डॉ.अमोल गीते म्हणाले की, “होमिओपॅथिक डॉक्टरांनी केवळ सहा महिन्यांचा समकालीन औषधशास्त्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केल्याने त्यांना ‘वैद्यकीय’ डॉक्टर समजणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. एमबीबीएस ही पाच वर्षांची कठीण आणि शिस्तबद्ध पदवी आहे. अशा तात्पुरत्या अभ्यासक्रमातून पूर्ण वैद्यकीय शिक्षणाची समकक्षा साधता येऊ शकत नाही.”
“महाराष्ट्र वैद्यकीय परिषद ही फक्त वैध एमबीबीएस आणि त्यावरील पदवी प्राप्त करणाऱ्या डॉक्टरांसाठीच आहे.
होमिओपॅथिक डॉक्टर हे स्वतंत्र प्रणालीचे प्रतिनिधी असून त्यांच्यासाठी स्वतंत्र परिषद (महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी) अस्तित्वात आहे.
सीसीएमपी हा एक वर्षाचा अल्पकालीन अभ्यासक्रम आहे, जो संपूर्ण एमबीबीएस शिक्षणाची समकक्षता सिद्ध करू शकत नाही.
अशा प्रकारे होमिओपॅथी डॉक्टरांची मागच्या दाराने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये सामावून घेणे, रुग्णांच्या सुरक्षिततेला आणि सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करु शकते. तसेच त्यांना स्वतंत्र वैद्यकीय काउन्सल असताना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मधे नोंदणी का ? असा सवाल विचारणारं निवेदन मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले.
या प्रकारचं निवेदन सर्व महाराष्ट्रातील आयएमए शाखांकडून दिनांक ८/०७/२०२५ रोजी देण्यात येणार आहे. जर हा अन्यायकारक निर्णय मागे घेण्यात आला नाही तर महाराष्ट्रभर लोकशाही मार्गाने राज्यव्यापी आंदोलनं छेडले जाईल, असा इशाराही आयएमए राज्याध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी दिला.
हे निवेदन देण्यासाठी डॉ गिरी, डॉ बारकुल, डॉ चोले, डॉ ओस्तवाल ,डॉ योगे, डॉ .पवार तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ सुनीता बारकुल आणि डॉ देवयानी खरवडकर डॉ.रजनी मारकड, डॉ उषा ढगे उपस्थित होते. तसेच बीड सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पैठणकर आणि सचिव डॉ.शिंदे संतोष, डॉ. अनिल सानप, डॉ रोहन गायकवाड यांनी पाठिंबा दर्शवला.
बीड जिल्ह्यातील स्त्री रोग संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. शिवाजी सानप आणि सचिव डॉ.शिंदे शरद आणि अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत सानप आणि सचिव डॉ. गणेश देशमुख आणि मॅग्मो संघटनेचे डॉ. संजय कदम व डॉ.कागदे उपस्थित होते. या सर्व संघटनांनी या अन्यायकारक निर्णयाचा निषेध नोंदवला व त्यांच्या संघटनेमार्फत या निर्णयाचा विरोध करून निवेदन देण्यात आले.
sdfghjkld