हिंगोली : वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष आणि कळमनुरी विधानसभेचे २०२४ चे उमेदवार डॉ. दिलीप तातेराव मस्के (नाईक) यांनी गेल्या महिन्यात वंचित बहुजन आघाडीच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सुरू असताना त्यांनी मंगळवारी मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख कैलासराव खिल्लारे, वंचित बहुजन कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अफजल शेख, काँग्रेसचे कळमनुरी तालुकाध्यक्ष पंडितराव पतंगे, मसोड गावचे सरपंच उत्तमराव कुरवाडे, काँग्रेसचे डॉ. अच्युत पतंगे, काँग्रेसचे कळमनुरी माजी उपनगराध्यक्ष पठाण आयुब खान, शिवसेना ठाकरे गटाचे शेख आयुब भाई, एमआयएमचे कळमनुरी शहराध्यक्ष सलीम कुरेशी, काँग्रेसचे मामुद आश्रफी यांनी प्रवेश केला. या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात आणि कळमनुरी विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
कोण आहेत डॉ. दिलीप मस्के?
दिलीप तातेराव मस्के (नाईक) हे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील पारडी येथील गावचे रहिवासी आहेत. २०१९ ला आपल्या वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा देऊन वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केला, त्यानंतर त्यांनी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीसाठी काम केलं, शिवाय १०० गावांमध्ये गाव तिथे शाखा सुरू करून पक्षाचं मोठ्या प्रमाणात संघटन वाढवलं. याच कामाची पोचपावती म्हणून त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदी धुरा देण्यात आली होती. याचबरोबर एक वोट एक नोट ही संकल्पना डॉ दिलीप मस्के यांनी २०२४ ला कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर राबवली. त्यांनी विद्यमान आमदार यांना तगडे आव्हान देत २० हजार मते घेतली. त्यांनी ७ वर्षात वंचित बहुजन आघाडीसाठी त्यांचा पक्षाला आणि कार्यकर्त्याला मोठा आर्थिक आधार होता. परंतु कार्यकर्त्यांचा आग्रह आणि जनतेची कामे आपल्याला सरकारच्या माध्यमातून कामे करता यावी याकरिता मस्केांनी गेल्या महिन्यात पक्षाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पक्षातील गटबाजी असल्यामुळे दिला.
यावेळी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राजूभैया नवघरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बिडी बांगर, राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हा सरचिटणीस बाबुराव वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. वसंतराव पतंगे, कळमनुरी विधानसभा अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, राष्ट्रवादी भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ठाकूर सिंग, बावरी सेनगाव तालुकाध्यक्ष विकास शिंदे, विशाल पौळ, नझीम रजवी यांची उपस्थिती होती.