बीड : कोचिंग क्लासेसच्या नावाखाली अफाट पैसा कमावणारा बीड शहरातील विजय पवार नावाचा क्लासेस मालक बलात्काराच्या गुन्ह्यात अडकला आहे. १७ वर्षीय शाळकरी मुलीला सर्व जण निघून गेल्यानंतर केबिनमध्ये बोलवून तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा त्याच्यावर आरोप आहे आणि घाबरलेल्या पीडितेने आई-वडिलांना ही माहिती दिल्यानंतर सर्व प्रकार समोर आला. गेल्या काही दिवसांपासून विजय पवार आणि त्याचा सहकारी प्रशांत खाटोकर हे दोघेही या मुलीला शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. उमा किरण कोचिंग क्लासेसच्या नावाखाली अनेक मुलींना विजय पवार याने आपलं सावज बनवलं असण्याची शक्यता असल्यामुळे पोलिस त्या दिशेनेही तपास करत आहेत.

विजय पवार हा राजकीय वरदहस्त असलेला व्यक्ती आहे आणि तो बीडचे आमदार संदिप क्षीरसागर यांच्यासोबत अनेक फोटोंमध्येही दिसून येतो. याशिवाय बीड जिल्ह्यात जेव्हा जेव्हा मनोज जरांगे यांचा दौरा असायचा तेव्हा त्याच्या नियोजनासाठी आर्थिक मदतही विजय पवार हाच पुरवायचा आणि सगळं नियोजनही विजय पवारकडेच असायचं. राजकीय वरदहस्त आणि प्रोफेशनल टीच या राज्यव्यापी संघटनेचा विजय पवार हा अध्यक्ष असल्यामुळे आपलं कुणी काहीही वाकडं करु शकत नाही, अशा अविर्भावात तो होता. पीडितेला त्याने घडल्या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास अनेकदा जीवे मारण्याचीही धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
पीडितेची नेमकी तक्रार काय?
१७ वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, प्रशांत खाटोकर हा सातत्याने मला मानसिक त्रास देत होता. दुपारच्या वेळेत माझा क्लास संपल्यानंतर मला तो गाडीत बसण्यासाठी आग्रह करायचा आणि न बसल्यास त्रास द्यायचा. सगळे मुलं निघून गेल्यानंतर केबिनमध्ये बोलवून बॅड टच करायचा आणि जबरदस्तीही करायचा. खाटोकरच्या त्रासाला कंटाळून एक दिवस विजय पवारकडे जाण्याचा निर्णय घेतला जेणेकरुन खाटोकरची तक्रार केल्यानंतर यातून सुटका होईल. मात्र पवारनेही असाच प्रकार केला आणि खाटोकरला मुलींना त्रास देण्यासाठीच ठेवलंय, असं धक्कादायक उत्तर पवारने दिलं. पवारने संबंधित पीडितेला अनेकदा केबिनमध्ये बोलवून तिला बॅड टच केले आणि लगटही केली. घाबरुन गेलेल्या पीडितेने हा सर्व प्रकार मैत्रिणीला सांगितला, ज्याने मैत्रिणही घाबरुन गेली. पण सगळे मुलं निघून जात असताना पीडितेला बाजूला उभा केलं जायचं, ज्यामुळे सर्व जण तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागले. हा सर्व त्रास असहाय्य झाल्यानंतर पीडितेने विजय पवार आणि खाटोकर या दोघांविषयी आई-वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. पालकांनी तातडीने पोलिस स्टेशन गाठलं आणि विजय पवारही तक्रार दिली.

राजकीय आश्रय असल्यामुळे आपलं कुणीही काहीही वाकडं करु शकत नाही, असं तो पीडितेला वारंवार सांगायचा. आता हे दोन्हीही आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दोघांवरही पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय, मात्र पोलिसांनी त्यांना तातडीने पकडून सखोल तपासा करावा, अशी मागणी बीडमधील संघटनांनी केली आहे. पोलिसांनी हलगर्जीपणा केल्यास सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही देण्यात आलाय.
One thought on “Beed News | जरांगेंचा कट्टर समर्थक, संदिप क्षीरसागरांचा लाडका, नराधम विजय पवार कोण आहे?”