बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते योगेश क्षीरसागर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्याने जिल्ह्यात सर्वांच्या भुवया उंचावल्या. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी संदिप क्षीरसागर यांच्या बाजूने उभा राहण्याची भूमिका घेतल्यानंतर योगेश क्षीरसागर यांना मोठा फटका बसला होता आणि त्यामुळेच त्यांचा पराभवही झाला होता. यानंतर सातत्याने संदिप क्षीरसागर यांनी आपण जरांगे निष्ठावंत असल्याचं वेळोवेळी दाखवून दिल्याने मतदारसंघातील मराठा समाज संदिप क्षीरसागरांच्या मागे असल्याचं चित्र निर्माण झालं. आता योगेश क्षीरसागर यांनी पत्नी सारिका क्षीरसागर यांच्यासह भेट घेतल्याने या बैठकीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
जरांगेंच्या समर्थनार्थ सर्वात पहिला राजीनामा
योगेश क्षीरसागर हे गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार होते आणि ते मुंडे समर्थक असल्यामुळे जरांगे समर्थकांची मते संदिप क्षीरसागर यांना मिळाली. मात्र योगेश क्षीरसागर हे राजकारणात येण्याच्या आधीपासून जरांगेंच्या आंदोलनात सक्रिय भूमिका घेत होते. जरांगे यांनी सुरुवातीच्या काळात जेव्हा उपोषण केलं तेव्हा सर्वपक्षीयांनी सामूहिक राजीनामे देण्याची भूमिका घेतली होती. मराठा समाजाला आरक्षण देऊन उपोषण सोडवण्यासाठी हे राजीनामे दिले जात होते. त्यावेळी बीडमधून योगेश क्षीरसागर यांनी सर्वात आधी बीड विधानसभा प्रमुख या पदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्याचे फोटोही तेव्हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. याशिवाय जरांगेंचं पहिलं आणि दुसरं उपोषण झालं तेव्हा जनभावना प्रचंड तीव्र होती. मराठा समाजातील सहकाऱ्यांसह योगेश क्षीरसागर यांनी रस्त्यावर उतरुन त्यावेळी आंदोलनही केलं होतं.
नारायण गडावर झालेल्या दसरा मेळाव्यासाठी योगेश क्षीरसागर यांनी मराठा समाजातील कार्यकर्ते आणि मतदारांसाठी प्रवासाची सर्व व्यवस्था करुन दिली होती. मात्र योगेश क्षीरसागर यांनी आतापर्यंत कधीही जाहिर भूमिका न घेतल्यामुळे त्यांच्यावर जरांगे विरोधक असा ठपका ठेवला गेला. शिवाय, विधानसभा काळात योगेश क्षीरसागर यांनी कोणतीही लाट कायम राहत नसते, असं एक वक्तव्य केलं होतं, जे जरांगेंच्या विरोधात असल्याच्या बातम्या आल्या. याचा फटका विधानसभा निवडणुकीतही बसला, मात्र जरांगे यांच्याविषयी आपण कधीही नकारात्मक बोललो नाही, असं स्पष्टीकरण योगेश क्षीरसागर यांनी दिलं होतं. माध्यमातून होणाऱ्या सर्व चर्चा आणि समज-गैरसमज या पार्श्वभूमीवर क्षीरसागर पती पत्नी यांची भेट महत्वपूर्ण मानली जाते.
जरांगे-क्षीरसागर भेटीत काय चर्चा झाली?
मनोज जरांगे यांच्यासोबतची भेट ही पूर्णपणे अराजकीय असल्याचं क्षीरसागरांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र या भेटीत योगेश क्षीरसागर यांनी त्यांची स्वतःची भूमिका, त्यांनी आतापर्यंत मराठा आरक्षण आंदोलनात घेतलेला सहभाग, मराठा समाजातील कार्यकर्त्यांना दिलेलं पाठबळ या सगळ्या गोष्टी मनोज जरांगे यांच्या कानावर घातल्याची माहिती आहे. बीडमधील एका कार्यक्रमात क्षीरसागर आणि जरांगे यांची भेट झाली होती आणि त्यानंतर अंतरवाली सराटीत जाऊन भेटीचं नियोजन ठरलं होतं. त्यानुसार योगेश क्षीरसागर यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली.
योगेश क्षीरसागरांसमोर आगामी निवडणुकीचं आव्हान
योगेश क्षीरसागर यांनी आतापर्यंत जरांगे यांच्या विरोधात कधीही भूमिका घेतली नसली तरी बीड मतदारसंघातील मराठा समाजाचं संदिप क्षीरसागर यांच्या बाजूने झुकतं माप राहिलंय. अंतरवालीतल्या या भेटीमुळे कदाचित हे समीकरण बदलूही शकतं. मात्र योगेश क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आणि ते पंकजा मुंडे समर्थक म्हणूनही ओळखले जातात. एकीकडे मुंडे समर्थक अशी प्रतिमा आणि दुसरीकडे विधानसभेतला कटू अनुभव अशी क्षीरसागरंची सध्या कसोटी आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये योगेश क्षीरसागर यांना बीडचे समीकरणं जुळवताना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर जरांगे भेट पुढचा मार्ग सुकर करणारी असल्याची चर्चा आहे.