हिंगोली : राज्य मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचे समजत आहे. जर त्यामध्ये मला मंत्री केलं तर मला आरोग्यमंत्री व्हायला आवडेल अशी प्रतिक्रिया हिंगोली जिल्हातील कळमनुरी मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांनी दिली आहे. त्यामुळे नेहमीच कोणत्या न् कोणत्या कारणाने चर्चेत असलेले संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
श्रावण महिन्यात आमदार बांगर कावड यात्रा दरवर्षी काढत असतात आणि ही कावड यात्रा राज्यात चर्चेचा विषय असते. मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या कावड यात्रेला भेट देऊन भविकांचा उत्साह वाढविला होता. त्याच कावड यात्रेचे नियोजन सध्या आमदार बांगर करत असून श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी ही कावड यात्रा निघणार आहे. याविषयी त्यांनी आज सगळी माहिती दिली आणि संवाद साधला. मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कावड यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
एकंदरीत कावड यात्रेची तयारी जोरात सुरू असताना त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नामुळे ते पुन्हा चर्चेत आलेत. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे ते नेहमी चर्चेत असतात. मागील काही दिवसांपूर्वी संभाजीनगरच्या एमजीएममध्ये एका रुग्णाला केलेल्या मदतीमुळे ते चर्चेत आले होते. तर आता तुम्हाला जर मंत्री पद देण्याचे ठरले तर कोणते पद घ्यायला आवडेल असे बांगर यांना विचारले असता ते म्हणाले की, मला आरोग्यमंत्री व्हायला आवडेल. ते पुढं म्हणाले की, मी आरोग्य खात्यात काम करण्यास उत्सुक असून जे आमदार म्हणून काम करतो ते मंत्री म्हणून जास्त चांगले आणि राज्यात करता येईल.
परंतु आमदार संतोष बांगर आणि कावड यात्रा मात्र पुढील काळात चांगलीच चर्चेचा विषय असणार आहे.