जालना : मराठ्यांच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आहे आणि ही संधी कधी येत नाही. चालून आलेल्या संधीचे सोने करायचे शिका म्हणत मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी होणा-या मुंबईतील मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विजयाच्यावेळी खात बसायचं नाही, सण-उत्सव पुन्हा येणार आहेत पण आरक्षण पुन्हा नाही येणार त्यामुळे लेकरा बाळांचे वाटोळे करू नका. सण पुन्हा येतील पण लेकरांचे झालेले नुकसान पुन्हा कधीच भरून निघणार नाही. त्यामुळे सगळ्यानी मुंबईची तयारी करावी आणि सगळ्याना यायचं आहे असे मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.
वेळ वाया घालवू नका, सगळेच ताकदीने आता मुंबईला निघा. मी जरी तुमच्या जिल्हात, तालुक्यात, गावात आलो नाही म्हणून रूसूण बसू नका. आता मला माझं शरीर साथ देत नाही त्यामुळे तुमच्या गावात बैठका घ्या आणि मुंबईला नीघा. गावच्या बैठका गावातच घ्या आणि आपल्या गाड्या काढा. कोणी डॉक्टर, वकील, राजकारणी आणि ज्यांच्याकडे असतील त्या सगळ्यांना सांगा गाडी काढायला आणि सगळ्यांनी सहभागी व्हायचे आहे असे सांगितले.