रायगडावरील स्थानिक महिलेची संयोगीताराजेंविषयी तक्रार, शिवभक्ताने घटनेमागची स्टोरी सांगितली

gopichand padalkar on raigad

रायगड : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर रायगडावरील अतिक्रमण काढण्याच्या विरोधात स्थानिकांना आश्वस्त करण्यासाठी रायगडावरच्या धनगरवाडीत गेले होते. यावेळी एका स्थानिक महिलेने पुढे येऊन छत्रपती संभाजी राजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांच्याविषयी तक्रार केली की, शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशी शिवभक्तांनी आमचं अन्न विकत न घेता समितीकडून व्यवस्था करण्यात आलेलंच अन्न घ्यावं, असं संयोगिताराजे म्हणत होत्या. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आणि एकच चर्चा सुरु झली. मात्र समितीवरील सदस्य आणि शिवभक्त आकाश यादव यांनी याबाबतचं स्पष्टीकरण दिलं असून त्या दिवशी नेमकं काय घडलं त्याचीही स्टोरी सांगितली आहे.

स्थानिक महिलेचं म्हणणं काय?

सोशल मीडियावर जो व्हिडीओ समोर आला आहे त्यातील महिलेच्या म्हणण्यानुसार, स्थानिकांचं अन्न विकत घेऊन न खाता समितीच्या वतीने व्यवस्था करण्यात आलेलं अन्नच शिवभक्तांनी खावं असं आवाहन करण्यात आलं होतं. यामुळे स्थानिकांचा रोजगार बुडाला आणि गर्दीच्या दिवशीही व्यवसायाला हातभार लागला नाही, असं गाऱ्हाणं स्थानिक महिलेने गोपीचंद पडळकर यांच्यासमोर मांडलं. 

शिवभक्ताने काय स्पष्टीकरण दिलं?

आकाश यादव यांनी सांगितलं की मी स्वतः समितीवर आहे आणि त्या दिवशी काय घडलं त्या घटनेचा साक्षीदारही आहे. संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांचा कधीही राजकारणाशी संबंध नसतो आणि त्या अशा गोष्टींमध्ये कधीही पडत नाहीत. संयोगीताराजे एवढंच म्हणत होत्या की गडावर प्लास्टिकला बंदी आहे आणि समितीच्या वतीने त्यासाठी पुढाकार घेतला जातोय. शिवाय राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांसाठी अन्नछत्राची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. ज्या अन्नाची व्यवस्थाच मुळात शिवभक्तांसाठी करण्यात आलेली आहे ते खाण्याचं आवाहन करण्यात गैर काय, असंही आकाश यादव म्हणाले. 

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्या रायगड दौऱ्यानंतर काही शिवभक्तांनी तीव्र प्रतिक्रियाही दिल्या आहेत. रायगडावर कुणीही जात नव्हतं तेव्हा संभाजीराजे यांनी विकासाला सुरुवात केली होती. मात्र काही जणांना रायगड फक्त राजकारणासाठीच आठवतो, असंही काही शिवभक्त म्हणत आहेत. शेकडो किमी प्रवास करुन आलेल्या शिवभक्ताला मोफत अन्न उपलब्ध करुन देण्यात गैर काय, असाही सवाल शिवभक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *