पहिला गुलाल गोपीनाथ मुंडेंनी लावला, तरी सोळंकेंचं व्हिक्टिम कार्ड, राजकारणाची हिस्टरी काय?
बीड : प्रकाश सोळंके, शरद पवारांनी वडिलांना साथ दिल्याचा मोबदला म्हणून उपमुख्यमंत्री केलं, पण पक्षाची साथ सोडल्याचा राग लोकांच्या मनात होता आणि त्यानंतर दोनच वर्षात म्हणजे १९८० ला उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचा लोकांनी असा पराभव केला की त्यानंतर ते राजकारणातून बाहेर गेले ते कायमचे.
यानंतर सुंदरराव सोळंके यांची पुढची पिढी म्हणजे त्यांचा मुलगा प्रकाश सोळंके १९९१ ला पंचायत समिती सभापती झाले आणि सोळंके कुटुंबाचं यानिमित्ताने राजकारणात पुनरागमनही झालं. यानंतर १९९५ आणि २०१४ चा अपवाद वगळला तर प्रकाश सोळंके सातत्याने विधानसभेवर निवडून आले. राजकारणावर पकड बसवली आणि अजित पवारांनी त्यांना राज्यमंत्री होण्याची संधीही दिली.
२०२४ ला निवडून आल्यानंतर सत्तरी गाठलेल्या प्रकाश दादांना कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा होती ती निव्वळ फोल ठरली आणि प्रकाश दादा नाराज झाले. ते एवढे नाराज झाले की माझ्या मंत्रिपदाला माझी जात आडवी येतेय, असं व्हिक्टिम कार्ड त्यांना टाकावं लागलं. पण खरंच प्रकाश सोळंकेंना त्यांची जात आडवी येतेय का, प्रकाश सोळंकेंचं सुरुवातीपासूनचं राजकारण नेमकं कसं राहिलंय त्याचीच स्टोरी आपण पाहू.गोष्ट १९९५ ची आहे, जेव्हा राज्यात पहिल्यांदाच शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार आलं आणि बीड जिल्ह्याला गोपीनाथ मुंडे यांच्या रुपाने दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला.
या निवडणुकीत बीड जिल्ह्यातल्या माजलगाव मतदारसंघात युतीत बंडखोरी झाली. माजलगाव मतदारसंघ गोपीनाथ मुंडेंनी भाजपला सोडवून घेतला आणि नाराज झालेल्या बाजीराव जगताप या शिवसैनिकाने बंडखोरी करुन फक्त निवडणूक लढवलीच नाही, तर ३८८ मतांनी ती जिंकूनही दाखवली. भाजपचा उमेदवार या मतदारसंघात थेट पाचव्या क्रमांकावर फेकला गेला. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे राधाकृष्ण हुके पाटील राहिले. पण तिसऱ्या क्रमांकावर असा चेहरा होता जो भविष्यात या मतदारसंघातलं वातावरण बदलून टाकणार होता.
अगदी किरकोळ फरकाने प्रकाश सोळंकेंनी १९९५ च्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली.प्रकाश सोळंकेंनी १९९५ नंतर युती सरकारच्या काळात अपक्ष लढलेले असले तरी स्थानिक पातळीवर काम ठेवलं आणि गोपीनाथ मुंडेंच्या ते जवळ आले. उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याने ते राजकारणात काय नवीन नव्हते. पण ९० च्या दशकात सोळंके कुटुंबाची राजकीय वाताहत झाली होती आणि प्रकाश सोळंकेंनी पुनरागमन केलं होतं. खरं तर सोळंके यांच्याकडे गावची पाटीलकी होती आणि ते कायम गावातले पुढारी म्हणूनच परिचित असायचे. पूर्वीचा माजलगाव सहकारी साखर कारखाना, ज्याला आता सुंदरराव सोळंके साखर कारखाना म्हणून ओळखलं जातं या कारखान्याच्या माध्यमातून सोळंकेंनी जोरदार जम बसवला.
१९९२ ला या कारखान्याचा पहिला गाळप हंगाम झाला आणि त्यानंतर आजपर्यंत सातत्याने कोणताही खंड न पडता गाळप सुरु आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूचे कारखाने अडचणीत येत असताना सोळंकेंचा कारखाना शेतकऱ्यांची बिलं कायम वेळेवर देत आला आणि थोडंफार कमी-जास्त झालं तरी शेतकरी कधी नाराज होणार नाहीत याचीही काळजी घेतली. जवळच माजलगाव धरण, सिंदफणा आणि गोदावरी नदीचं पाणी, बिंदुसरा प्रकल्प यामुळे परिस्थिती अगदी बारामतीसारखी सुजलाम सुफलाम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही या कारखान्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यात कारखानाही शेतकऱ्यांची काळजी करणारा असल्यामुळे प्रकाश सोळंकेंचं एक मोठं नेटवर्क तयार झालं.
अशातच १९९९ ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना स्पष्ट दिसू लागलं की प्रकाश सोळंके या मतदारसंघात आपला हुकमी एक्का ठरु शकतात. गोपीनाथ मुंडेंनी सोळंकेंना भाजपात घेतलं आणि १९९९ ला निवडूनही आणलं. गोपीनाथ मुंडेंनी माजलगाव तालुक्यासह ओबीसीबहुल असलेला अख्खा धारुर तालुकाही सोळंकेंच्या बाजूने उभा केला आणि जे सोळंके विधानभवनात पुनरागमनासाठी अतुर झाले होते त्यांना आमदारकीचा पहिला गुलाल लावला. खरं तर १९९९ ला युतीचं सरकार गेलं होतं. मात्र गोपीनाथ मुंडेंनी या निवडणुकीत सुरेश धस, प्रकाश सोळंके यांसारखे चेहरे वंजारी मतांवर निवडून आणले आणि भाजपची जिल्ह्यात ताकद वाढवली. केंद्रात सरकार अटलबिहारी वाजपेयी यांचंच होतं आणि अशातच पुढे २००४ ची लोकसभा निवडणूक आली.
गोपीनाथ मुंडेंनी लोकसभेवर पाठवण्यासाठी प्रकाश सोळंकेंची निवड केली. मात्र या निवडणुकीत प्रकाश सोळंकेंचा पराभव झाला आणि आपल्याला बळीचा बकरा केलाय अशी त्यांची भावना झाली. यावर गोपीनाथ मुंडेंनी सहा महिन्यात उपाय काढला आणि २००४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश सोळंकेंना पुन्हा आमदार केलं. प्रकाश सोळंके पुन्हा आमदार जरी झाले असले तरी भाजपची परत कधीही सत्ता येणार नाही अशी त्यांची मानसिकता झाली होती आणि आधीच प्रमोद महाजन यांच्या अकाली निधनाच्या धक्क्यात असलेल्या गोपीनाथ मुंडेंना जिल्ह्यातूनच दोन धक्के बसले. सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना अजित दादांनी बळ दिलं.
तेव्हा पक्षांतरबंदी कायदा फारसा कडक नव्हता आणि त्यामुळेच भाजपचे आमदार असलेल्या दोन्ही आमदारांनी जाहिरपणे अजित दादांसाठी काम करायला सुरुवात केली. २००९ ला तर प्रकाश सोळंके राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले आणि त्यांना पुढे राज्यमंत्रीही होता आलं. पुढे २०१४ ला पराभव झाला झाला असला तरी २०१९ आणि २०२४ ला प्रकाश दादा पुन्हा निवडून आले. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे प्रकाश दादांनी वयाची सत्तरी गाठलेली असताना एक वक्तव्य केलंय ते म्हणजे आपल्या मंत्रिपदाच्या आड आपली जात आडवी येतेय. खरं तर प्रकाश सोळंके हे कायम सर्व जातीच्या मतांवर निवडून आलेत.
वंजारीबहुल भाग असलेल्या गावागावात सोळंकेंच्या कारखान्याचे मुकादम नियुक्त झाले आणि पकड थेट मतदारांपर्यंत पोहोचली. प्रकाश सोळंके कायम ५ ते १० हजारच्याच फरकाने जिंकून येत आलेत. ते या भागातला एकमेव मराठा चेहरा आहेत किंवा त्यांना पर्यायच नाही, अशीही परिस्थिती नाही. मात्र या मतदारसंघात ९६ कुळी विरुद्ध ९२ कुळी हा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरतो असं स्थानिक जाणकार सांगतात आणि त्यात प्रकाश सोळंके वरचढ ठरतात.
२०१४ ला देशमुख असलेले दिवंगत आरटी जीजा उभा राहिले आणि त्यांनी प्रकाश सोळंकेंना थोड्याथिडक्या नव्हे तर तब्बल ४० हजार मतांनी पाडलंही होतं. गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं ते हे साल होतं आणि मतदारांनी पंकजा मुंडेंनी दिलेल्या उमेदवारावर विश्वास दाखवला. तसं पाहायला गेलं तर पंकजा मुंडे आणि प्रकाश दादा यांचे संबंध कायम चांगले राहिलेत. विधानसभा निवडणूक कोणतीही असो, पंकजा मुंडे यांना मानणारा ऊसतोड कामगार आणि पंकजा मुंडेंच्या शब्दावर गावपातळीवरचं वातावरण बदलून टाकणारे मुकदाम यांची कायम प्रकाश सोळंके यांना मदत होत आलीय. याला काही जण राजकारणातली तडजोडही म्हणतात. पंकजा मुंडे जेव्हा लोकसभेला उभा राहिल्या तेव्हा जिल्ह्यात प्रचंड जातीयवाद झालेला असतानाही त्यांना माजलगाव लोकसभेत लीड भेटलं होतं.
प्रकाश सोळंके यांनी जे व्हिक्टिम कार्ड वापरलंय त्याकडे जरा पाहू, मंत्रिपदासाठी जात आडवी येते हे प्रकाश दादांचं मत कदाचित खरंही असेल. याचं कारण असंय की सुरुवातीपासूनच राज्याच्या मंत्रिमंडळात वंजारी समाजाचा एकही चेहरा नसायचा. बीड हा तसा ओबीसीबहुल जिल्हा आहे आणि किमान इथलं तरी पालकमंत्रीपद किंवा एखादं मंत्रिपद बिगर मराठा चेहऱ्याकडे असावं, असं सगळ्याच पक्षांचं गणित असायचं. मग तो शरद पवारांचा एकत्रित राष्ट्रवादी पक्ष असो किंवा भाजप, संधी दिली जाते ते बिगर मराठा चेहऱ्याला. आघाडीच्या काळात या जिल्ह्याचं नेतृत्त्व कायम विमलताई मुंदडा आणि जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे असायचं. त्याआधी केशरकाकू याही खासदार होत्या.
२०१४ ला गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे पालकमंत्री झाल्या, तर २०१९ ला महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर धनंजय मुंडे कृषीमंत्री झाले आणि पालकमंत्रीपदही सीनिअर असलेल्या प्रकाश दादांना डावलून त्यांनाच देण्यात आलं. राष्ट्रवादीतलं धनंजय मुंडेंचं तेव्हाचं महत्त्व आणि शरद पवारांचंही मत पाहता प्रकाश सोळंके गप्प राहिले. अडीच वर्षानंतर सत्ताबदल झाल्यानंतर महायुतीचं परत सरकार आलं आणि जिल्ह्याची सूत्र पुन्हा धनंजय मुंडे यांच्याकडेच गेली. प्रकाश सोळंके यांना पुन्हा एकदा शांत रहावं लागलं.
२०२४ ची निवडणूक लढण्याआधी प्रकाश सोळंकेंनी पुतण्याला राजकीय वारसादर घोषित केलं होतं आणि ते कदाचित निवडणूक लढणार नाहीत, असा अंदाज लावला जात होता. मात्र प्रकाश दादांनी स्पष्टीकरण दिलं की मी निवडणूक लढणार नाही, असं कधीही म्हणालो नव्हतो. वयाच्या सत्तरीकडे वळलेल्या प्रकाश दादांना किमान या टर्ममध्ये तरी मंत्रिपदाची अपेक्षा होती. पण यावेळी प्रकाश सोळंकेंना दोन धक्के होते ते म्हणजे एकाच मंत्रिमंडळात दोन्ही बहिण भावांना मंत्रिपद दिलं आणि जिल्ह्यातून एकाही मराठा चेहऱ्याला संधी दिली नाही.
पुढे काही दिवसातच धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपांमुळे राजीनामा देण्याची वेळ आल्यानंतर तरी संधी मिळेल अशी प्रकाश दादांना अपेक्षा होती. मात्र ती संधीही हुकली आणि अजित दादांनी ओबीसी असलेल्या छगन भुजबळांना संधी दिली. आता सगळ्या चौकशी संपल्यानंतर क्लीनचिट मिळालेल्या धनंजय मुंडे यांना पुन्हा कृषीमंत्री केलं जाऊ शकतं, अशी चर्चा सुरु झाली आणि प्रकाश दादांनी त्यांची शोकांतिका सांगितली की या जिल्ह्यात कायम बिगर मराठा चेहऱ्याकडेच नेृत्त्व दिलं जातं.
पण राजकीय जाणकार यांचं कारण असं सांगतात, की राज्यातील एकाही जिल्ह्यामध्ये मंत्रिमंडळात संधी द्यावा असा वंजारी चेहरा नसतो आणि बीडमधल्या एका चेहऱ्याला संधी देणं ही प्रत्येक पक्षाची गरज असते. त्यामुळे अर्थातच प्रकाश दादा जी शोकांतिका सांगतात ती खरीही आहे, पण राजकीय पक्ष म्हणून पाहिलं तर ती पक्षांची गरजही आहे. कारण या पक्षांना बीड जिल्ह्यातल्या बहुसंख्यांक असलेल्या मतदारांची तेवढीच गरज आहे. या बिगर मराठा मतांच्या बळावरच गोपीनाथ मुंडे यांनी अमरसिंह पंडित, सुरेश धस यांच्यासारख्या नेत्यांना पहिल्यांदाच आमदारकीचा गुलालही लावला आहे.