मुंबई : विधानभवन परिसरात पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर आज 18 जुलै रोजी सकाळी विधिमंडळात प्रवेश केल्यानंतर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, काल झालेली घटना ही चुकीची आहे. आणि त्या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष यांना प्रत्यक्ष भेटून जी योग्य वाटेल ती आम्हाला सक्त ताकित देऊन कारवाई करण्याची विनंती केली.
पडळकर पुढे म्हणाले की, आमच्या सहकाऱ्यांकडून चुकीची घटना घडली आहे. संदर्भात मी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली. अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारात जी कारवाई असेल ती करण्याची त्यांना विनंती सुद्धा केली होती. शेवटी कायदा सर्वश्रेष्ठ असून सहकाऱ्यांवर रात्री उशिरा एफ आय आर दाखल झाला आहे. आम्ही कायद्याला मानणारे लोक असून न्यायालयात सामोरे जाऊ असे सांगितले.
विधानभवनात झालेल्या घटनेच्या वेळी मी माझी लक्षवेधी संपवून नेमकाच बाहेर आलेलो होतो आणि कार्यकर्त्यांसोबत फोटो काढणे चालू होते. सकाळी नऊ वाजल्यापासून मी सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊन माझे प्रश्न मांडत होतो. पण शेवटचा एक प्रश्न राहिला होता मात्र संबंधित मंत्री महोदय सभागृहात उपस्थित नसल्यामुळे मी बाहेर निघालो तेव्हा आव्हाडांचा नितीन देशमुख नावाचा कार्यकर्ता जो की माझ्या ओळखीचा नव्हता तो गर्दीतून तिथे आला आणि नंतर हा सगळा प्रकार घडला.
परंतु झालेली सगळी घटना चुकीची असून विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती जो निर्णय घेतील त्यांना आम्ही सहकार्य करू. आमचे वकील यासंदर्भात न्यायालयात बाजू मांडतील असेही पडळकर यांनी सांगितले.रात्री उशिरा आव्हाड यांनी पोलिसांच्या गाडीसमोर केलेल्या आंदोलनाविषयी विचारले असता पडळकर यांनी त्यांनाच विचारायला सांगितले.