मुंबई : विधान भवन परिसरात झालेल्या आव्हाड आणि पडळकर यांच्या राड्यानंतर आज विधानसभेत बिंदू नामावलीचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी वाद झाला तरीही पडळकर यांनी आपला मुद्दा लावून धरला आणि शेवटी भुसेंना नमती भूमिका घ्यावी लागली.
राज्यातील बिंदू नामावली मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून फक्त शिक्षण विभागात दोन ते तीन लाख लोकांवरती अन्याय झाला आहे. हा अन्याय महाराष्ट्रातील SC, ST, OBC, VJNT समाजातील हक्कांच्या नोकऱ्यांवर झाला असल्याचे सांगितलं. मागासवर्गीयांची मुलं ज्यावेळी नोकर भरतीत ओपन मधून लागतात त्यावेळी ते त्यांच्या जातीत दाखवून हा घोळ करण्यात येत असल्याची बाब पडळकर यांनी सभागृहात मांडली. यावेळी अध्यक्ष आणि दादा भुसे यांनी पडळकर यांच्या प्रश्नांवर हरकत घेतली त्यामुळे पडळकर चांगलेच चिडल्याचे दिसले.
खरेतर हा बिंदूनामावलीचा मुद्दा आमदार सुरेश धस यांनी चर्चेत आणला होता परंतु आता गोपीचंद पडळकर यांनी पुराव्यानिशी सभागृहात हा घोटाळा उघडक करत सरकारला प्रश्न विचारले. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आव्हाड आणि पडळकर यांच्या वादानंतर आता बिंदूनामावलीचा विषय चर्चेत आल्याने पुन्हा एकदा विधिमंडळाच्या सभागृहात मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे.