मुंबई, प्रकाश पाटील : राज्यात भाजपाची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मंगळवारी धाराशिव जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांसह राज्यातील इतर जिल्ह्यांतील विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजपा) प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या या भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमात अनेक माजी आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, बाजार समिती संचालक आदींचा समावेश होता.
या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचे माजी उमेदवार दिलीप भालेराव, जिल्हा काँग्रेस समितीचे माजी कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे धाराशिवमधील राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, वसई-विरारमधील उबाठा गटाचे माजी पदाधिकारी, बविआचे माजी जिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक, रायगड आणि अमरावतीमधील विविध पक्षातील स्थानिक नेते व कार्यकर्ते यांनीही भाजपा प्रवेश केला.या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करताना सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी आणि निर्णायक नेतृत्वामुळे देश आणि राज्यात विकासाचे नवीन पर्व सुरू आहे. या विकासाभिमुख कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून विविध पक्षांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपात सहभागी होत आहेत. पक्ष सर्व नव्या कार्यकर्त्यांना सन्मान देईल आणि त्यांच्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी पाठिंबा देईल.”या पक्षप्रवेश समारंभात ज्येष्ठ नेते आ. प्रकाश भारसाकळे, आ. स्नेहा पंडित-दुबे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, माजी मंत्री व लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी मान्यवर उपस्थित होते.
धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पक्षप्रवेशधाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे 10 माजी सदस्य, 11 माजी सभापती, सहा माजी नगराध्यक्ष, एक बाजार समितीचे सभापती, बाजार समितीचे 13 संचालक, पाच माजी उपनगराध्यक्ष, पाच माजी उपसभापती, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दोन संचालक, तसेच 15 नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.उमरगा-लोहारा तालुक्यातून भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये विशेष उल्लेखनीय आहेत — जि.प. माजी अध्यक्ष राजेंद्र जगताप, माजी सभापती किसनराव कांबळे, बाबुराव राठोड, तालुका काँग्रेस समिती अध्यक्ष सुभाष राजोळे, युवक काँग्रेस अध्यक्ष चंद्रशेखर पवार, महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा संगीता कडगंचे, माजी पं.स. सभापती सचिन पाटील, माजी उपसभापती दगडू मोरे, दत्ता चिंचोळे, माजी जि.प. सदस्य डॉ. विक्रम जिवनगे, न.पं. अध्यक्ष प्रेमलता टोपगे.
वसई-विरारमधूनही भाजपात बळकटी‘उबाठा’ गटाचे नालासोपारा माजी जिल्हा प्रमुख पंकज देशमुख, माजी नगरसेवक व माजी उपजिल्हा प्रमुख किशोर पाटील, विभाग प्रमुख संतोष राणे, रवि राठोड, शाखा प्रमुख धनाजी पाटील, वसई शहर समन्वयक निलेश भानुशे, उप शहर प्रमुख प्रकाश देवळेकर यांनी भाजपा प्रवेश केला.अमरावती आणि रायगड जिल्ह्यातूनही सामीलअमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीचे माजी नगराध्यक्ष देविदास नेमाडे यांच्यासह गौरव नेमाडे, निलेश आवंडकर, आकाश येऊल, उमेश दातीर आदी अनेक कार्यकर्ते भाजपात आले.
रायगडमधूनही मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांचा सहभाग दिसून आला. दक्षिण रायगडमधील बापूसाहेब सोनगीरे यांच्यासह अनेकांनी भाजपात प्रवेश केला.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागप्रमुख मुकुंद जांबरे (न्हावे), शिवसेना (ठाकरे गट) चे गोरेगाव शहरप्रमुख प्रदीप गोरेगावकर, मनसेचे विभागप्रमुख अमोल पवार, मनसेचेच मंदार महामुंणकर, भिरा गावातील काँग्रेसचे अनिकेत महामुंणकर, तसेच पन्हळघर शिवसेनेचे अनिल महाडिक यांचा समावेश आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची तयारीया पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर बोलताना भाजपचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील म्हणाले, “धाराशिव जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला 100 टक्के यश मिळेल. पक्षशिस्त, नेतृत्व आणि विकासकामांमुळे जनतेचा भाजपावर वाढता विश्वास या पक्षप्रवेशातून स्पष्ट होत आहे.”
एकूणच काँग्रेससह विविध पक्षांना मोठा धक्का देणाऱ्या या प्रवेशामुळे भाजपच्या संघटनात्मक बळात भर पडली आहे. राज्यभरातील जिल्ह्यांमधून अशा पक्षप्रवेशांची मालिका सुरू असून, यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा विजय मार्ग सुकर होईल, अशी भाजपमधील सूत्रांची धारणा आहे.