मुंबई : विधिमंडळ परिसरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ लक्ष घातले आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, विधान भवन परिसरात अशाप्रकारे कृत्य करणे चुकीचे आहे आणि हा सर्व परिसर विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्या कार्यक्षेत्रात येतो. त्यामुळे त्यांनी झालेल्या प्रकारावर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, झालेला प्रकार अत्यंत गंभीर असून विधिमंडळ परिसरात अशाप्रकारे मारामारी करणे योग्य नाही. या परिसरात मोठ्या संख्येत लोक जमत मारामारी करतात हे विधानसभेला शोभत नाही. त्यामुळे संबंधितावर कठोर कारवाई करण्याची विनंती अध्यक्ष आणि सभापती यांच्याकडे केली आहे.
तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर यांच्यावर जोरदार आरोप करत मला मारण्यासाठी हे बाहेरून गुंड आणले होते पण त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचे सांगितले.
पडळकर यांनी हाणामारीची घटना घडल्यानंतर तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पुढे त्यांनी झालेल्या प्रकाराविषयी दिलगिरी व्यक्त केली असून याविषयी सविस्तर माहिती वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून देणार असल्याचे सांगितलं.
विधिमंडळ परिसरात झालेल्या या राड्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले तर जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप केले. अशा प्रकारच्या घटनांमुळे विधिमंडळाचे पावित्र्य कसे राखले जाणार असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.