मुंबई :काँग्रेसचे निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा आक्रमक पवित्रा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर थेट गंभीर आरोप केले. मतदार यादीतील बोगस मतदार, पक्षपाती कारभार आणि निवडणुकीच्या प्रक्रियेतील अपारदर्शकता याबाबत त्यांनी सवाल उपस्थित केले. त्यांच्या या आरोपानंतर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन केले. हे आंदोलन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात पार पडले. मुंबईतील आझाद मैदान येथे झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. घोषणाबाजी, निषेध फलक आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात रोष व्यक्त करत काँग्रेसने आपली असंतोषाची भूमिका स्पष्ट केली.
काँग्रेसचे निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा आक्रमक पवित्रा या आंदोलनात बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मतदार यादीतील गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. अनेक जागांवर विरोधी पक्षांच्या मतदारांचे नावे गायब आहेत, तर काही ठिकाणी एकाच व्यक्तीचे अनेक नावं आहेत. हे कुणाच्या आदेशावरून होत आहे, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.”
निवडणूक आयोगाकडून अजून स्पष्टीकरण नाही
राहुल गांधी यांच्या आरोपांवर कालपासून संपूर्ण देशभर चर्चा सुरु आहे. परंतु, अद्याप निवडणूक आयोगाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. काँग्रेसच्या आरोपांची गंभीर दखल घेत आयोग पुढील काही दिवसांत प्रतिक्रिया देतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पुढील टप्प्यात जिल्हा पातळीवर आंदोलन
प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी स्पष्ट केले की हे आंदोलन केवळ सुरुवात आहे. पुढील टप्प्यात जिल्हा आणि तालुका पातळीवर निवडणूक आयोगाच्या विरोधात जनजागृती मोहिमा आणि निषेध आंदोलनं आयोजित केली जातील. “निवडणुकीचा गाभा म्हणजे मतदार यादी. तीच जर खोटी असेल, तर निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास हरवेल,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि आयोगावर निशाणा साधला.