नंदुरबार, प्रितम निकम : नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा गावाजवळील तापी आणि गोमाई नदीमध्ये केमिकलयुक्त दूषित पाणी रासायनिक हिरवे पाणी सोडण्यात आले आहे. मागील चार दिवसांपासून प्रकाशा येथील गोमाई नदीमध्ये हिरव्या रंगाचे केमिकल युक्त पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्यामुळे नदीतील मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत.
गोमाई नदीमध्ये केमिकलयुक्त दूषित पाणी नदीत सोडण्यात आलेल्या हिरव्या रंगाच्या केमिकल युक्त पाण्यामुळे परिसरात पसरली दुर्गंधी पसरली आहे. या रासायनिक पाण्यामुळे नदीतील मासे मोठ्या प्रमाणात मरत असून याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप मच्छीमारांचा आणि ग्रामस्थांचा आहे.
या हिरव्या रंगाचा पाण्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य राहिले नसून यामुळे त्वचेचे आजार किंवा इतर आरोग्य समस्या उद्भवत आहेत. तसेच गुरेढोरे आणि लहान मुले जे नदीत जातात, त्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.
सध्या श्रावण महिना सुरू होणार असल्याने, तापी नदीत लाखो भाविक स्नानासाठी येतात. गोमाई नदीचे पाणी पुढे तापीला मिळत असल्याने, या दूषित पाण्यामुळे त्यांना रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता. एका बाजूला राज्य शासन नदी स्वच्छता अभियान राबवत असताना, दुसरीकडे गोमाई नदीत असे रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे.
ग्रामस्थांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करून, नदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, या पाण्याचे स्त्रोत शोधून त्यावर त्वरित नियंत्रण मिळवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.