मुंबई, प्रकाश पाटील :कबूतरखान्यावर बंदी, जैन समाज अस्वस्थ, दादरमध्ये आंदोलन पेटलं मुंबई महापालिकेकडून दादरमधील ऐतिहासिक कबूतर खाण्यावर घातलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर जैन समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला असून तब्बल ९२ वर्षांचा इतिहास असलेल्या या कबूतर खाण्यावरील अलीकडील बंदी आणि ताडपत्री लावून त्याचा उपयोग थांबवल्याने नाराज झालेल्या जैन समाजाने रविवारी सकाळी तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिसांशी झटापटीही झाली.
बंदीमुळे धार्मिक भावना दुखावल्या, जैन समाजाचा आरोप
दादर पश्चिमेला असलेल्या या कबूतर खाण्याचे जैन धर्मीय समाजासाठी एक पवित्र स्थान मानले जाते. अनेक जैन कुटुंबे येथे दररोज नियमितपणे कबूतरांना दाणे घालण्यासाठी आणि धार्मिक कर्तव्य पार पाडण्यासाठी येत असतात. कबूतरांना अन्न देणे हे अहिंसा आणि परोपकार यांचे प्रतीक मानले जाते. मात्र मुंबई महापालिकेने आरोग्याच्या आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या कारणास्तव या ठिकाणी कबूतरांना अन्न देण्यावर बंदी घालून संपूर्ण ठिकाण ताडपत्रीने आच्छादित केले.
ताडपत्री हटवण्याचा प्रयत्न, पोलिसांशी झटापट
या आंदोलकांनी कबूतर खाण्यावर लावलेली ताडपत्री जबरदस्तीने हटवण्याचा प्रयत्न केला. काही आंदोलकांनी थेट ताडपत्री ओढून फेकून दिली. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, काही आंदोलक पोलिसांशी झटापटीत उतरले. काही क्षण वातावरण तणावपूर्ण झाले होते. पोलिसांनी नंतर परिस्थिती नियंत्रणात आणली.
92 वर्षांचा इतिहास
दादरमधील हे कबूतरखाना केवळ एक दाणे घालण्याचे ठिकाण नसून, त्याला जैन समाजाने धार्मिक ठिकाणाचे स्वरूप दिले आहे. याचे स्थापत्य १९३० च्या सुमारास झाले असून, तेव्हापासून जैन समाज येथे नियमित सेवा देत आहे. विशेषतः दादरमधील पारशी व जैन वस्तीमुळे या ठिकाणी कबूतर खाण्याला मोठे महत्त्व मिळाले होते.
आरोग्याच्या कारणास्तव बंदी; महापालिकेची भूमिका
दुसरीकडे महापालिकेने कबूतर खाण्यामुळे परिसरात होणाऱ्या आरोग्यधोका आणि प्रदूषणाची कारणे पुढे करत ही बंदी घातली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या निरीक्षणानुसार, कबूतरांच्या विष्ठेमुळे परिसरात दमा, अॅलर्जी आणि इतर श्वसनविकार होण्याचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरीकांच्या तक्रारी वाढल्याने पालिकेने कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले. तर कबूतर खाण्यावर ताडपत्री लावून त्यावर बंदी घालण्यात आल्यापासून मुंबईतील जैन समाजाच्या अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. श्री दादर जैन सभा, मुंबई जैन युवा संघ आदी संस्थांनी याविरोधात आवाज उठवला असून, हे धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
श्री दादर जैन सभेचे अध्यक्ष सुभाष शहा यांनी सांगितले की, “कबूतरांना दाणा घालणे हा आमचा शतकानुशत चालत आलेला धर्माचरणाचा भाग आहे. त्यावर बंदी घालणे म्हणजे आमच्या धार्मिक भावनांवर आघात आहे. पालिकेने आरोग्याच्या नावाखाली धार्मिक स्थळांवर अतिक्रमण सुरू केले आहे.”