मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेले गोकुळ दौंड यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. या पक्षप्रवेशा संदर्भात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी सकारात्मक संवाद झाल्याचे सांगितले आहे.
गोकुळ दौंड हे पाथर्डी येथील भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी मागील 25 वर्ष भारतीय जनता पार्टीत पंकजा मुंडे यांचे कट्टर कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. तसेच दौंड हे माजी सभापती असून ते संघटनेमध्ये ओबीसी जिल्हा अध्यक्ष होते. 25 वर्ष सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची सगळीकडे ओळख होती.
गोकुळ दौंड यांनी सांगितले की, माझे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेशा संदर्भात अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच मुंबई येथे पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणार आहे.