अहमदाबादमधील घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेत महाराष्ट्राच्या डोंबिवलीतील 27 वर्षीय रोशनी सोनघरे या एअर होस्टेसचा सुद्धा मृत्यू झाला आहे. तिचा मृत्यू झाल्याने डोंबिवली परिसरात शोककळा पसरली आहे. रोशनीने लहानपणापासून एअर होस्टेस बनण्याचे स्वप्न पाहीले होते आणि तिने संघर्ष करून ते स्वप्न पूर्ण सुद्धा केले. मात्र, तिच्या आयुष्याचा प्रवासअहमदाबादमधील अपघातात संपला.
अहमदाबादहून लंडनकडे १२ जून रोजी जाणाऱ्या एअर इंडिया AI171 या विमानाने टेकऑफ केल्यानंतर काही क्षणातच ते विमान कोसळत मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यू पावलेली रोशनी सोनघरे या डोंबिवलीत नव उमीया कृपा सोसायटीत आई-वडील आणि भावासोबत राहत होती. वडील राजेंद्र सोनघरे आणि आई राजश्री यांनी प्रतिकूल परिस्थितीत असताना सुद्धा आपल्या दोन्ही मुलांना शिकवले.
गुरुवारी सकाळी तिने आई-वडिलांचा निरोप घेऊन अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या फ्लाईटसाठी ती ड्युटीवर गेली ती मात्र परत आलीच नाही. कारण तिचा विमान दुर्घटना अपघातात मृत्यू झाला. रोशनीच्या मृत्यूने सोनघरे कुटुंब खचून गेलं असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.