नंदुरबार : कृषिमंत्री पद धोक्यात विधीमंडळात ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच वादात सापडले आहेत. याआधीही कोकाटे अनेकवेळा वादात आल्यामुळे त्यांचा राजीनामा होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर कोकाटे यांनी थेट शनिदेवाचे दार गाठले आहे.
आज ( २६ जुलै ) रोजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्याच्या दौ-यावर असून त्यांनी देशातील एकमेव साडेसाती मुक्त स्थान म्हणून प्रसिध्द असलेले शनिमांडळ येथील शनिमंदिरात जाऊन दर्शन घेत पूजा केली. मागील अनेक दिवसांपासून मागे लागलेली साडेसाती दुर व्हावी आणि आपल्या कृषि मंत्री पदाचा राजिनामा टळला जावा यासाठी ही पूजाकरण्यात आल्याचे बोलले जात आहे.
येणा-या मंगळवारी राज्यात महत्वाच्या घडामोडी घडण्याच्या शक्यता असून विरोधकांकडून कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यानुसार मंगळवारी हा राजीनामा होण्याची शक्यता आहे. आपल्यावर आलेले हे संकट टळले जावे यासाठी शनी देवाकडे साकडे घातले गेले आहे.