मुंबई : राज्यात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा जंगली रमी खेळतानाचे व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी शेअर करत सरकारवर निशाणा साधत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत सरकार कधी गंभीर होणार आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे.
रोहित पवारांनी जो व्हिडिओ शेअर केलाय त्यामध्ये कृषिमंत्री कोकाटे जंगली रम्मी हा खेळ खेळत असताना स्पष्टपणे दिसत आहेत. याआधीही कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल खालच्या दर्जाचे वक्तव्य करत रोष ओढवून घेतला होता. पण त्यातून कुठलाही बोध न घेता कोकाटे पुन्हा एकदा आपले कर्तव्य आणि जबाबदारी विसरल्याचे दिसून येत आहे.
रोहित पवार यांनी “जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!” म्हणत काय म्हणाले आहेत ते पाहू… सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? अशाही प्रश्न त्यांनी विचारला आहे