मुंबई, प्रकाश पाटील : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील सीमाभागातील १४ गावांची महाराष्ट्रात सामाविष्ट होण्याची वाट अखेर मोकळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेली चार दशके राज्याच्या कुशीत यावं, यासाठी धडपड करणाऱ्या या गावांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे या गावांतील हजारो नागरिकांच्या अस्मितेचा आणि विकासाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गावांना महाराष्ट्रात सहभागी करून घेण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्य सरकारने या गावांच्या सीमाविषयक गोंधळावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला असून, अलीकडेच मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सीमांकनासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि वनमंत्री गणेश नाईक हेही उपस्थित होते. या बैठकीनंतर सीमारेषा निश्चित करून पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या गावांमधील नागरिक अनेक वर्षांपासून दुभंगलेल्या ओळखीच्या समस्येला सामोरे जात आहेत. एका बाजूला महाराष्ट्राचे आकर्षण, दुसरीकडे तेलंगणाचे अधिकार, यात या गावांची ओळख अधांतरी राहिली होती. नागरिकांकडे दोन राज्यांचे ओळखपत्र, मतदार यादीत नावे, आणि अनेकदा एकाच निवडणुकीत दुहेरी मतदानाचे प्रकार दिसून आले आहेत. ही परिस्थिती निवडणूक आयोगाच्या दृष्टीनेही विलक्षण होती.
१९८० पासून सातत्याने या गावांनी महाराष्ट्रात सामील होण्याची मागणी केली आहे. स्थानिक आमदार देवराव भोंगळे यांनीही विधानसभेत हा मुद्दा वारंवार उपस्थित करून गावकऱ्यांचा आवाज पोचवला. अखेर शासनाच्या निर्णयामुळे गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या गावांतील शेतकऱ्यांकडे असलेल्या जमीन अभिलेखांमध्ये ‘सरकार’ असा भोगवटादार दाखवला गेला आहे. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ या शेतकऱ्यांना मिळत नव्हता. आता सीमांकन प्रक्रियेनंतर या नोंदी सुधारल्या जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचे मालकी हक्क मिळण्याची वाट मोकळी होणार आहे.
या निर्णयामुळे गावांमध्ये शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधांचा विकास साधता येणार असून, प्रशासनाकडून थेट सेवा पोहचवता येतील. दशकानुदशके दुर्लक्षित राहिलेल्या या गावांचे आता खराखुरा पुनर्विकास होण्याचा मार्ग खुला झाला आहे. गावकऱ्यांमध्ये यामुळे नवचैतन्य निर्माण झाले असून, “महाराष्ट्रात सामील होण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरेल,” अशा प्रतिक्रिया स्थानिक पातळीवरून येत आहेत.
mz9g7l