
सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून त्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी मांडत सरकारकडे विविध मागण्या केल्या आणि त्याला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन सभागृहात दिले. पडळकरांनी केलेल्या त्या मागण्या आणि त्यावर मिळालेले आश्वासन काय आहे?
मागील महिन्यात सांगली जिल्ह्यातील ऋतुजा राजगे या उच्चशिक्षित विवाहित महिलेने सात महिन्याच्या गरोदर अवस्थेत ख्रिश्चन धर्मांतराला विरोध करत आत्महत्या केली आहे. त्यामुळे तिला न्याय मिळावा. तसेच ज्यांनी महाराष्ट्रात SC, ST, OBC, VJNT या जातींचा दाखला जोडून नोकरीला लागले आणि त्यानंतर धर्मांतर केले अशा प्रशासनातील नोकरदारांना बडतर्फ करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाचा दाखला देत केली.
सरकारी जमिनीवरील अवैध प्रार्थना स्थळांची आकडेवारी आणि त्याची यादी येत्या 15 दिवसामध्ये काढण्याची सूचना त्या त्या विभागांना देण्यात यावी. जर अवैध प्रार्थना स्थळे निर्माण केली असतील तर ती किती दिवसांमध्ये पाडण्यात येतील असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला.
सगळ्यात शेवटी पडळकर यांनी महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कडक कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत तो कायदा किती दिवसात करण्यात येणार आहे असे विचारले. लव्ह जिहाद संदर्भातील कायद्या कधी करण्यात येणार असाही प्रश्न उपस्थित करत मंत्र्यांकडे उत्तर मागितले.
या सगळ्या प्रश्नांवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक उत्तर देत ऋतुजाच्या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी लावण्यात येणार असल्याचे सांगितले. धर्मांतर विरोधी जो कायदा आहे तो जास्तीत जास्त कडक करण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे विषय मांडणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय अवैध चर्च आणि प्रार्थना स्थळ यावर सुद्धा चौकशी करून त्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात मंत्र्यांनी दिले.