तेहरान : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल (Iran Israel Conflict) यांच्यात सीजफायर झाल्याचा दावा केल्यानंतर काही क्षणातच इराणने इस्रायलवर पुन्हा हल्ला केला आणि ट्रम्प यांना तोंडावर पाडलं. जगातील सर्वात शक्तीशाली देशाच्या राष्ट्राध्यक्षांना तोंडावर पाडल्यामुळे इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष आता किती टोकाला पोहोचलाय याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. इराणने केलेल्या मिसाईल हल्ल्यात इस्रायलच्या दक्षिणेतील बिशाबा शहरात तीन जणांचा मृत्यू झालाय, तर एका इमारतीच्या डेब्रिसमध्ये बरेच जण अडकल्याचीही माहिती स्थानिक मीडियाने दिली आहे.
इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष गेल्या १२ दिवसांपासून तीव्र झालेला असतानाच अमेरिकेच्या बी-२ बॉम्बर या लढाऊ विमानाने इराणच्या तीन अणुबॉम्ब साठ्यांवर हल्ले केले आणि त्यांना निष्क्रिय केलं. यानंतर इराणनेही प्रत्युत्तर देत कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले चढवले. यामुळे आखाती देशांमधील काही देशांची हवाई हद्द बंदही करण्यात आली होती. इराणचे अणुबॉम्ब साठे टार्गेट केल्यानंतर अमेरिकेवरही प्रहार करण्यास सुरुवात करण्यात आली.
इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्याप्रमाणे अजून तरी कोणताही युद्धविरामाचा करार झालेला नाही आणि तशी चर्चाही झालेली नाही. मात्र इस्रायलने जर त्यांचे हल्ले थांबवले तर इराणला हा संघर्ष पुढे वाढवण्याची कोणतीही इच्छा नाही.
इस्रायल आणि इराण यांच्यातल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे ढग आहेत. कारण, इराणच्या ताब्यात असलेल्या स्ट्रेट ऑफ हर्मुजमधून जगातला बहुतांश व्यापार होतो आणि जगासाठी तेल इथूनच निर्यात केलं जातं. इराणने जर हा मार्ग बंद केला तर जागतिक स्तरावर तेल संकट तयार होऊ शकतं आणि त्यामुळे नव्या युद्धाचीही सुरुवात होेऊ शकते. मात्र अजून तरी या वाहतूक मार्गावर कोणताही अडथळा तयार झालेला नाही आणि तेल वाहतूक सुरळीत सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर निर्यातदारांनी सुटकेचा निःश्वास घेतला होता, मात्र हा दिलासा अल्पकालीनच ठरला.