बीड : १७ वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या विजय पवारचा कारनामा समोर आल्यानंतर त्याने शिक्षकी पेशाला कसा काळीमा फासलाय हे महाराष्ट्राने पाहिलं. या घटनेनंतर संशय व्यक्त केला जाऊ लागला की अशीच घटना अजूनही बऱ्याच मुलींसोबत झाली असण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार बीड पोलिसांनी जाहिर आवाहन केलं की पालकांनी पुढे यावं आणि विजय पवारच्या विरोधात तक्रार करावी. यानंतर पहिला तक्रारदार जो समोर आलाय त्याने सांगितलेल्या गोष्टी हादरवून टाकणाऱ्या आहेत. विजय पवारने एका छोटाशा मुलीला कसं टार्गेट केलं हे तक्रारीत तर दिसून आलंयच, पण या विजय पवारच्या मनात अल्पसंख्यांक जातींविषयी किती द्वेष होता त्याचंही उदाहरण समोर आलंय. शाळेच्या कार्यक्रमात फुले आणि आंबेडकरांचा फोटो का लावला नाही हा जाब विचारणाऱ्या बापाच्या लेकीला कसं टॉर्चर केलं आणि या प्रकरणात पुढे नेमकं काय काय घडलं तेच मी तुम्हाला या व्हिडीओत सांगणार आहे.
विजय पवारच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सभागृहातूनच एसआयटी नियुक्त करण्याची घोषणा केली आणि या प्रकरणात आणखीही बरेच खुलासे होणार आहेत हे स्पष्ट झालं. ज्या १७ वर्षीय मुलीच्या प्रकरणात विजय पवार अटक झालाय त्या प्रकरणातही पोलिस अजून सखोल तपास करणार आहेत आणि यासाठी पीडितेच्या वडिलांनीह पोलीस अधीक्षकांना पत्र दिलंय. विजय पवारचा दबदबा बीडमध्ये किती होता ते या व्हिडीओत पुढे तुम्हाला कळेलच, मात्र अटक होऊन सुद्धा पोलिसांवरही त्याचा सुरुवातीला आशीर्वाद होता का याचीही आता चौकशी होणार आहे. विजय पवार अटक झाल्यावर त्याला फक्त दोनच दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली. एरवी अशा गुन्ह्यांमध्ये किमान १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाते. विजय पवारला शक्य तेवढं लवकर न्यायालयीन कोठडीत पाठवायचं आणि जामिनाचा मार्ग मोकळा करायचा असं हे सुरुवातीचं नियोजन होतं. मात्र प्रकरण मीडियात आलं आणि विजय पवारचा पोलिसांचा आशीर्वाद घेण्याचा प्लॅन फसला. उलट आता ज्या तपास अधिकाऱ्याने फक्त दोनच दिवसांची पीसीआर मागितली, त्याचीच चौकशी आयपीएस अधिकाऱ्यामार्फत केली जाणार आहे. हा सगळा तपास सुरु असतानाच बीड पोलिसांनी एक आवाहन केलं होतं की अजून काही मुलींसोबत असा प्रकार घडला असेल तर पालकांनी न घाबरता समोर यावं. यासाठी बीडच्या पोलिस अधीक्षकांनी विशेष हेल्प लाईन जारी केली आणि स्वतःचाही नंबर यासाठी जाहिर केला. पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जो पहिला तक्रारदार समोर आलाय त्यांची स्टोरी मन सुन्न करणारीय.. या तक्रारदाराच्या मुलीला दोन वर्षांपूर्वी एवढं टॉर्चर केलं गेलं की पालकांनी शेवटी तिची शाळा बदलून टाकली. उमाकिरण कोचिंग क्लासेससोबतच विजय पवारची शाळाही आहे आणि याच शाळेतला हा प्रकार आहे. मुलीला टॉर्चरचं कारणही या घटनेपेक्षा लाजिरवाणं आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने विजय पवारच्या शाळेने रॅली काढली होती. या रॅलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जाणिवपूर्वक विजय पवारने अभिवादन करणं टाळलं होतं. म्हणून त्यावेळच्या वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे यांनी तक्रार केली. संबंधित मुलीच्या वडिलांचीही या तक्रारीवर सही होती. याच दिवसापासून शाळेत शिकणाऱ्या मुलीलाही टॉर्चर करणं सुरु झालं. विजय पवार हा संबंधित मुलीला केबिनमध्ये बोलवून घ्यायचा, तिला धमकी द्यायचा की तुझ्या बापाला सांग विजय पवारच्या नादाला लागू नको. या मुलीचे आजोबा शाळेत एकदा जाब विचारायला गेले तर तुमच्यासारख्या जातीच्या लोकांना माझ्या शाळेत थारा नाही, असा अपमान करुन त्यांना परत पाठवलं गेलं. मुलीचे वडील हे माजी सैनिक आहेत आणि त्यांनी या विरोधात संबंधित शिक्षणाधिकाऱ्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली. मात्र आजपर्यंत त्या तक्रारीवर काहीही कारवाई झाली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्यासाठी एका समितीची नियुक्ती केली, मात्र या समितीला विजय पवारने शाळेत येऊच दिलं नाही. आता क्लासेसमध्ये मुलीचं लैंगिक शोषण केल्यानंतर तेव्हा शाळेत शिकणाऱ्या मुलीनेही आपल्या बापाला तिच्यासोबत काय झालं होतं ते सांगितलं. वडिलांना राग येईल म्हणून मुलीने तेव्हा फक्त टॉर्चर करतोय एवढंच सांगितलं, मात्र विजय पवारचे कारनामे समोर आल्यानंतर या अल्पवयीन मुलीनेही वडिलांना सांगितलं की माझ्यासोबतही विजय पवार असंच करायचा. केबिनमध्ये बोलवायचा, गाल ओढायचा, खांद्यावर हात टाकायचा आणि वाईट नजरेने पाहायचा. माजी सैनिकाने दोन वर्षांपूर्वीच्या प्रकरणात कोणतीही कारवाई न झाल्यामुळे मुलीची शाळा बदलली आणि हात टेकले. पण मुलीने आता विजय पवारचे जे कारनामे सांगितले ते पाहून थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं. पोलिस अधीक्षकांनीही सगळी तक्रार ऐकून घेतली आणि त्यावर कारवाईचं आश्वासन दिलं.
खरं तर विजय पवार हा प्रचंड जातीयवादी मानसिकतेचा होता आणि महापुरुषांचे फोटो शाळेत लावतानाही तो त्यात जात पाहायचा, असं त्याच्याच शाळेतले काही शिक्षक सांगतात. बीड शहरातील प्लॉटिंग व्यवसाय, अवैध बांधकामं आणि प्रकरणं मंजूर करुन घेण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव हे विजय पवारचे हातखंडे होते. आमदाराचा निकटवर्तीय असल्याचं सगळ्या शहराला माहित होतं आणि त्याचाच फायदा घेऊन तो सर्व प्रकारची बेकायदेशीर कामंही करायचा. विजय पवारच्या शाळेत आणि क्लासेसमध्ये ज्या मुली शिकायच्या या खरं तर विजय पवारच्या मुलीपेक्षाही कमी वयाच्या होत्या. पण तरीही या मुलींपैकी गरीब कुटुंबातल्या मुलींना तो टार्गेट करायचा आणि ज्यांचे आई-वडील तक्रार करायला घाबरतात त्यांचा गैरफायदा घ्यायचा. विजय पवारच्या शाळेत महिला कर्मचाऱ्यांनाही नीट वागणूक दिली जात नसल्याचं काही शिक्षक सांगतात. विजय पवार हा या प्रकरणातला फक्त एक आरोपी नसून ती एक प्रवृत्ती आहे जिला वेळीच न ठेचलं तर ती वाढत जाते. शाळेतल्या अल्पसंख्यांक मुलींना टार्गेट, त्यांच्या पालकांना जातीवाचक शिवीगाळ आणि अपमान हे प्रकार तो सर्रास करायचा. आपलं कुणी काहीही वाकडं करु शकत नाही असंही तो जाहिरपणे बोलून दाखवायचा. त्यामुळेच या तक्रारींच्या तपासासोबतच आता त्याने जी संपत्ती अवैध मार्गातून कमावलीय आणि ज्या संपत्तीच्या बळावर तो हा मुजोरीपणा करायचा त्या संपत्तीवरही पोलिसांनी टाच आणणं गरजेचंय.