जयपूर : वायूदलाचं जग्वार हे लढाऊ विमान कोसळून दोन्हीही वैमानिकांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या विमान दुर्घटनेत स्थानिकांचं कोणतंही नुकसान झालं नसून दोन वैमानिकांच्या मृत्यूला वायूदलाने दुजोरा दिला आहे. विमान कोसळल्यानंतर प्रचंड मोठा आवाज झाला आणि यानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. स्थानिकांनी बचावकार्य केलं, मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. या दुर्घटनेत गंभीर दुखापत झालेल्या दोन्ही वैमानिकांचा यात मृत्यू झाला.
राजस्थानच्या चुरु जिल्ह्यातील रत्नागड शहराजवळ ही घटना घडली. गेल्या तीन महिन्यातली ही दुसरी घटना असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. वायूदलाकडून नियमित सराव केला जात असतानाच हा अपघात घडला.
तीन महिन्यांपूर्वीच गुजरातच्या जामनगरमधील वायूदलाच्या तळापासून काही अंतरावर विमानाचा असाच अपघात झाला होता. सुदैवाने यात दोन वैमानिक वाचले होते, तर एकाचा मृत्यू झाला होता.