मुंबई : या बातमीतला जो विषय आहे तो काहींची चिंता वाढवणार आहे तर काहींच्या फायद्याचाही आहे. कारण, सोमवारी विधानसभेत सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या राज्यातल्या तरुण अविवाहित जोडप्यांची थेट दुखती नस पकडलीय.. बिनलग्नाच्या जोडप्यांना रुम देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ओयो रुम्सच्या चौकशीची मागणी सभागृहात झाली आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या हॉटेल चैन्सपैकी एक असलेल्या ओयोभोवतीही आता चौकशीचं सावट आहे. फक्त ओळखपत्राच्या आधारावर रुम देणाऱ्या हॉटेल्समध्ये जोडप्यांकडून तासावर रुम घेतल्या जातायत आणि या रुम बहुतांश शहर आणि गावापासून निर्जनस्थळीही आहेत, परिणामी संस्कृतीचं रक्षण करणारं हे सरकार आहे, याची तातडीने चौकशी लावावी आणि त्या एक तासात नेमकं काय केलं जातं ते शोधून काढावं अशी मागणी पुरवणी मागण्यांवर बोलताना सुधीरभाऊंनी केली. सभागृहात ही मागणी झालीय म्हटल्यावर यावर कारवाई तर तातडीने होणारच आहे आणि गृहराज्यमंत्रीही त्यावर उत्तर देतील, पण महाराष्ट्रातून ओयो खरंच हद्दपार होईल का, ओयो रुम्स नेमक्या काय आहेत त्याचीच माहिती मी तुम्हाला या बातमीत मिळणार आहे.
ओयोची सुरुवात आणि चर्चेत का आली?
ओयो रुम्स… प्रेम करणाऱ्या तरुण आणि तरुणींसाठी हे २०१८ पासून गो टू डेस्टिनेशन बनलंय. अगदी छोट्या छोट्या खेड्यांमध्येही ओयोच्या रुम्स हल्ली दिसत आहेत. ओयो या कंपनीने स्वतःची फ्रँचायझी सिस्टम केल्यापासून व्यवसायात ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. ओयो हॉटेल्स चेनमध्ये भारतासह जगभरातल्या ५ हजार शहरांमध्ये चार लाख ५० हजारांपेक्षा जास्त हॉटेल्स जोडले गेले आहेत. भारतासह मलेशिया, म्यानमार, बांगलादेश, नेपाळ या देशातही ओयोचे हॉटेल्स आढळतात. ओयोने कंपनीची सुरुवात केली तेव्हा हॉटेलसोबत भागीदारीचं मॉडल होतं, ज्यात ओयोच्या अॅपवरुन रुम बुक केली जायची आणि त्याचा काही मोबदला ओयोला मिळायचा. मात्र आता ओयोने फ्रँचायझी सिस्टम केल्यापासून कंपनीचा व्यवसाय वाढलाय आणि ग्राहकही वाढले आहे. ओयोची स्थापना रितेश अग्रवाल या तरुणाने वयाच्या २० व्या वर्षीच केली होती. रितेश अग्रवालने सुरुवातीला एअरबीएनबी ही बुकिंग कंपनी सुरु केली, यानंतर प्रतिसाद वाढलला पाहून २०१३ मध्ये भांडवल उभा केलं आणि ओयोची स्थापना केली. ओयो रुम्स गेल्या काही वर्षात आपल्या प्रचंड मोठ्या विस्तारामुळे चर्चेत आहेत. ओयो रुम्सच्या बाहेर हॉटेल्सकडून अनेकदा तासाभरासाठी रुम मिळेल, असेही फलक लावलेले दिसतात. विशेष म्हणजे ओयो रुमवर अविवाहित जोडप्यांनाही रुम दिल्या जातात. यापूर्वी अविवाहित जोडप्यांना रुम हॉटेल्सकडून देण्यात येत नव्हत्या, मात्र ओयोने याची सुरुवात केली आणि वाढती स्पर्धा पाहून सर्वच हॉटेल्सलाही असाच निर्णय घ्यावा लागला.
तासाभरासाठी रुम का दिली जाते?
ओयो रुम्समध्ये एक तासासाठी नेमकं काय केलं जातं, याचा शोध घ्यावा अशी मागणी विधानसभेत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. शहरापासून दूर २० किमी अंतरावर कोणतीही परवानगी न घेता हॉटेल्सची सुरुवात केलेली आहे आणि इथे ओयोच्या नावाखाली हजार रुपयात तासभरासाठी रुम देण्यात येतात. या सुरक्षेचा प्रश्न तर आहेच, शिवाय संस्कृती जपण्याचाही आहे, यासाठी सरकार आणि पोलीस विभाग काय करणार आहे, असा प्रश्न सुधीर मुनगंटीवारांनी गृहराज्यमंत्र्यांना विचारला. ओयोकडून यावर अजून काहीही स्पष्टीकरण आलेलं नाही, मात्र गृहराज्यमंत्री अंतिम आठवड्यात यावर अधिकचं स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे.
VIDEO :