दोन पत्र, दोन भेटी, धनंजय मुंडेंनी संदिप क्षीरसागरांची झोप उडवली, पुन्हा नाव घेतलं

dhananjay munde meets cm and dcm

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी बीड शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची विधानभवनात भेट घेतली. या प्रकरणात बीड जिल्ह्याबाहेरील एका अनुभवी आयपीएस दर्जाच्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून स्वतंत्र चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे. या प्रकरणात गेल्या वर्षभरापासून संदिप क्षीरसागरांच्या वरदहस्तानेच सगळं सुरु आहे आणि त्याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

बीड शहरातील उमाकिरण संकुलात आरोपी विजय पवार आणि प्रशांत खटोकर यांनी अल्पवयीन मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी वैद्यकीय रजेवर आणि अन्य तालुक्यात नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यामार्फत नाट्यमय रित्या अटक केली. या प्रकरणात सुरू असलेला तपास समाधानकारक नाही, शिवाय अनेक मुलींचं लैंगिक शोषण या नराधमांनी केलं असून त्यांना असलेल्या स्थानिक राजकीय पाठबळमुळे पीडित मुली तक्रार द्यायला धजावत नाहीत, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या दबावातून या आरोपींना वाचवण्याचे काम केले जाऊ शकते, त्यामुळे या प्रकरणात पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी एका महिला आय पी एस अधिकारी यांच्यामार्फत स्वतंत्र निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

पोलिसांची पुरावे गोळा करण्यात टाळाटाळ?

या प्रकरणी तपासात डिजिटल पुरावे गोळा करणे ही प्राथमिकता होती, मात्र आरोपी, त्यांचे नातेवाईक, मदत करणारे यांचे सीडीआर, आयपीडीआर, व्हॉटसअप चॅट, इन्स्टा, चॅट, प्रायव्हेट कॉलिंग, मोबाईल डेटा मधील व्हिडिओ, फोटो, व्हॉटसअप कॉल, फेस टाईम कॉल यांपैकी पोलिसांनी अद्याप काहीही ताब्यात घेतले नसल्याची माहिती आहे, तसेच संकुलात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये १३ जून पूर्वीचे फुटेज उपलब्ध नाही, अशा अनेक त्रुटी पोलीस तपासात दिसून येत असल्याचा उल्लेखही धनंजय मुंडे यांनी केला आहे. 

या प्रकरणातील पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांना स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या निकटवर्तीयाकडून धमकावले जात असून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला जात आहे, अशाच प्रकारच्या दबावामुळे इतर पीडित मुली समोर येऊन तक्रार द्यायला धजावत नाहीत, असंही धनंजय मुंडेंनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान संबंधित आरोपींपैकी विजय पवार यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असून, ते स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सोबत अनेक व्यवहार एकत्र करतात, बेनामी जमिनी, प्लॉट, रेड झोन मध्ये खाजगी शाळेचे बांधकाम असे अनेक काळे कारनामे यांनी संगनमताने केले असून याचीही चौकशी होणे गरजेचं असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान पवार आणि त्याच्या गँगने कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून हजारो रुपयांची फी वसुली केली आहे. वेळेत फी भरू न शकलेल्या गरीब कुटुंबातील मुलींना टार्गेट केलं. क्लासेसच्या नावाखाली केली जाणारी ही आर्थिक लूट थांबावी, यासाठी बीडच नव्हे तर सबंध राज्यातील कोचिंग क्लासेस चालकांना फी मर्यादा, वसुली, विद्यार्थ्यांची सुरक्षा यांसारख्या कायदेशीर आणि नैतिक संहिता लागू करण्यासाठी एक धोरण निश्चित केले जाऊन तशी नियमावली निर्गमित केली जावी, अशी मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पत्रावर काय म्हणाले?

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बाहेर आल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांना तोंडी या घटनेची सर्व हकीकत सांगितली आणि त्यानंतर तपासाचा आवाका वाढवू, असं मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय अजित दादांनी तातडीने पोलिसा अधीक्षकांना फोन लावला आणि या तपासात कुठलीही पळवाट राहू नये याची काळजी घेण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे मिळून एसआयटीबाबत निर्णय घेतील, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

धनंजय मुंडे यांची पत्रकार परिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *