बीड : मंत्रिपद गेल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले ते बीडमधील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी झालेल्या गुन्ह्यानंतर. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणा फक्त भूमिकाच घेतली नाही तर आरोपी विजय पवार हा ज्या आमदाराचा निकटवर्तीय आहे त्या संदिप क्षीरसागर यांचं थेट नावही घेतलं आणि मदत करणारा सुद्धा आरोपी होऊ शकतो, असं म्हणत एसआयटी चौकशी लावण्याची मागणी केली. सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत असून कामकाजाच्या पहिल्याच दिवशी संदिप क्षीरसागरांची डोकेदुखी वाढणार आहे. कारण, मीडियाच्या प्रश्नांची ठोस उत्तरं त्यांना द्यावी लागतील. आता प्रश्न निर्माण होतो या प्रकरणात खरंच एसआयटी चौकशी लागू शकते का, विजय पवारला मदत करणारेही गोत्यात येऊ शकतात का? याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या बातमीत मिळणार आहेत.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
धनंजय मुंडे यांनी जे आरोप केलेत त्यापैकी काही मुद्दे
१. विजय पवारवर गुन्हा दाखल झाला त्या दिवशी तो रात्री ११ वाजता संदिप क्षीरसागरसोबत होता
२. संदिप क्षीरसागरला भेटल्यानंतर विजय पवार फरार झाला
३. संदिप क्षीरसागर, विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांचे सीडीआर पोलिसांनी तातडीने तपासावेत
४. या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांना बोलून एसआयटी चौकशी लावणार
५. विजय पवारच्या संकुलात ५ हजार विद्यार्थी शिकतात, अजूनही काही मुलींसोबत हा प्रकार घडलाय
६. मुलींचे आई वडील बदनामीच्या भीतीपोटी पुढे यायला तयार नाहीत, मात्र पोलिसांनी सर्वांचे जबाब घ्यावेत
७. पीडितेचे आई वडील पोलीस अधीक्षकांना भेटून तपासाचा आवाका वाढवण्याची मागणी करणार
८. सध्या जो तपास सुरुय त्यातून आरोपीला कोणतीही शिक्षा होणार नाही
९. आमदाराच्या आशीर्वादाने विजय पवारचा सध्या बीडमध्ये प्लॉटिंगचा व्यवसाय, अधिकाऱ्यांनाही कायम दमदाटी
१०. विजय पवारच्या मुलीला नीट परीक्षेत ७०० पेक्षा जास्त मार्क, नीट घोटाळ्यातही त्याचा समावेश
संदिप क्षीरसागरांचीही चौकशी होणार?
धनंजय मुंडे यांनी पीडितेच्या पालकांना आश्वासन दिलंय की मुख्यमंत्र्यांना बोलून या प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी होईल. विजय पवारवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय आणि आरोपीला मदत करणाऱ्यालाही गुन्हेगाराएवढीच शिक्षा होते, असं धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे एवढ्यावरच न थांबता पुढे म्हणाले की, देवेंद्र भाऊंची भेट घेऊन एसआयटी लागेपर्यंत मी याचा पाठपुरावा करणार आहे आणि सहआरोपी वाढवण्याचीही मागणी करणार आहे.
पावसाळी अधिवेशन आणि संदिप क्षीरसागरांची डोकेदुखी
गेल्या अधिवेशनात संदिप क्षीरसागर यांच्यासह बीड जिल्ह्यातील अर्धा डझन नेत्यांनी धनंजय मुंडे यांना सळो की पळो केलं होतं. परिणामी धनंजय मुंडे यांनी पूर्ण अधिवेशन कालावधीकडे पाठ फिरवली होती. या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आता संदिप क्षीरसागर यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला पळून जाण्यासाठी मदत केल्या प्रकरणीत संदिप क्षीरसागर चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे.
धनंजय मुंडे यांची संपूर्ण पत्रकार परिषद