Beed Vijay Pawar | फक्त गरीब घरच्या मुलींनाच टार्गेट करायचा, विजय पवारची मोडस ऑपरेंडी काय होती?

beed vijay pawar

बीड : एका १७ वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बीडमधील उमाकिरण क्लासेसचा मालक विजय पवारविषयी (Beed Vijay Pawar) आता धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. क्लासेसच्या मालकावरच गुन्हा दाखल झाल्यनंतर सगळ्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि सर्वांनी उमाकिरण कॉम्प्लेक्सजवळ क्लासची फी परत घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी गर्दी केली. काही पालकांनी आपल्या मुलींना विजय पवारच्या वर्तवणुकीविषयी विचारणा केल्यानंतर काही धक्कादायक गोष्टीही समोर आल्या आहेत. विजय पवार हा फक्त गरीब कुटुंबातल्याच मुलींना टार्गेट करायचा, अशी माहिती क्लासमध्ये शिकणाऱ्या मुलींनी दिली आहे.

१७ वर्षीय मुलीला केबिनमध्ये एकटीला बोलवून तिच्यासोबत जबरदस्ती केल्या प्रकरणी विजय पवारवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. विजय पवारच्या क्लासमध्ये फक्त फिजिक्स विषय शिकवला जायचा आणि त्यासाठी एका वर्षाची २२ हजार रुपये फी होती. याच संकुलात उर्वरित विषय सुद्धा शिकवले जायचे आणि चार विषयांची एकूण फी जवळपास ८८ हजार रुपये होती. फी भरणे आणि प्रवेश प्रक्रिया यात विजय पवारची अनेक पालकांशीही ओळख व्हायची आणि कोण कसं आहे हे तो त्यावेळीच ओळखायचा. 

स्टोरी डॉट कॉमने काही पालकांशी या प्रकरणावर चर्चा केली. यात अशी माहिती मिळाली की, ज्या मुली गरीब घरच्या आहेत आणि त्यांच्या पालकांना कुणाचा आधार नाही अशाच मुलींना विजय पवार टार्गेट करायचा. क्लासमधील विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार, यापूर्वीही बऱ्याच मुलींना मनात लज्जा उत्पन्न होईल असं अपमानजनक बोलणं, कुणी नसताना केबिनमध्ये बोलवून मुलींच्या मनात भीती तयार होेईल, अशी वर्तवणूक करणं हे प्रकार सर्रास घडले आहेत. क्लासमधील बऱ्याच मुलींनी यावर आपापसात चर्चा केली आणि काही मुलींनी पालकांच्याही कानावर हा विषय घातला. मात्र बदनामीच्या भीतीपोटी पालकांनी कोणतीही तक्रार केली नाही.

विजय पवार हा संदिप क्षीरसागर यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता आहे आणि त्याच बळावर तो मुजोरीही करायचा. पालकांनाही मुजोर भाषेत बोलणं, मुलींना सावज बनवणं असे प्रकार त्याने केल्याचं काही पालक सांगतात. विजय पवारच्या क्लासमध्ये १०० ते २०० विद्यार्थी शिक्षण घेतात आणि यात बहुतांश मुलं ही ग्रामीण भागातून शिकण्यासाठी आलेले आहेत. तर बीड शहरातीलही काही मुलं यात आहेत. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर विजय पवार आणि त्याचा सहकारी प्रशांत खाटोकर हे दोघेही फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी तीन पथकं तयार केले आहेत. विद्यार्थ्यांसोबत घडलेला हा प्रकार असल्यामुळे पालकांच्या मनात सध्या भीतीचं वातावरण तयार झालंय. विजय पवारच्या राजकीय वरदहस्ताविषयी सुद्धा बीडमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

One thought on “Beed Vijay Pawar | फक्त गरीब घरच्या मुलींनाच टार्गेट करायचा, विजय पवारची मोडस ऑपरेंडी काय होती?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *