इस्लामाबाद : तहरिक ए तालिबानने दिलेल्या झटक्यात पाकिस्तान आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा आयएसआयला मोठा धक्का बसला आहे. कारण, या हल्ल्यात पाकिस्तान आर्मीच्या मेजर रँकच्या अधिकाऱ्यासह डझनभर सैनिकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी पाकिस्तानातील खैबर पख्तुन्वा प्रांतात झालेल्या या हल्ल्यात ६ सीडीओ बटालियनचा मोईस अब्बाससह त्यांच्या बटालियनमधील सैनिकांचाही मृत्यू झाला. याच बटालियनने भारतीय वायू दलाचे कॅप्टन अभिनंदन यांना पकडल्याचा दावा केला होता.
भारताने बालाकोट एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्ताननेही त्याला प्रत्युत्तर दिलं होतं आणि पाकिस्तानचे विमानं परतवून लावताना कॅप्टन अभिनंदन चुकून पाकव्याप्त काश्मीरच्या हवाई हद्दीत गेले होते. यावेळी त्यांचं विमान पाडलं गेलं आणि पॅराशूटच्या सहाय्याने स्वतःची सुटका करुन घेतलेले कॅप्टन अभिनंदन पीओकेमध्येच पडले. यानंतर पाकिस्तानच्या सीडीओ बटालियनने त्यांना पकडलं आणि अटक केली होती. तीन दिवस ताब्यात ठेवल्यानंतर कॅप्टन अभिनंदन यांना पाकिस्तानकडून सोडण्यात आलं. या शौर्याबाबत भारताने अभिनंदन यांचा वीर चक्र देऊन सन्मान केला होता आणि ग्रुप कॅप्टन या पदावर बढतीही दिली होती.
कॅप्टन अभिनंदन यांना पकडणाऱ्या मोईस अब्बास यांनाही मेजर या पदावर पाकिस्तान सैन्याकडून बढती देण्यात आली होती. टीटीएफने केलेल्या हल्ल्यात मोईस अब्बास शहिद झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असिफ मुनीर यानेही हजेरी लावली आणि पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनीही श्रद्धांजली वाहिली. मोईस अब्बास हे एसएसजी कमांडो होते आणि नंतर त्यांना बढती देण्यात आली होती.
फेब्रुवारी २०१९ च्या शेवटी जेव्हा कॅप्टन अभिनंदन यांना पकडण्यात आलं होतं तेव्हा त्यांच्या व्हिडीओंसह मोईस अब्बास यांनीच माध्यमांसमोर आणलं होतं. अभिनंदन यांची स्थानिकांकडून सुटका करुन स्वतःच्या ताब्यात घेताना मोईस अब्बास व्हिडीओत दिसत होते. टीटीएफने दोन ठिकाणी केलेल्या हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झालाय. टीटीएफला भारताकडून समर्थन मिळत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात येतोय.