मुंबई : २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीच्या मृत्यूनंतर आता नवी अपडेट समोर येत आहे. मुंबईतल्या साठ्ये महाविद्यालयातल्या २१ वर्षीय तरुणीने तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली होती. मात्र ही आत्महत्या नसून तिचा घातपात झाल्याची शंका कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. आमची मुलगी आत्महत्या करण्यासाठी तिच्याकडे कोणतंही कारण नव्हतं, असं कुटुंबियांचं म्हणणं आहे.
मुंबईतल्या साठ्ये महाविद्यालयाविषयी ही बातमी समोर आल्यानंतर याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर चौकशीही सुरु केली. मात्र काही माध्यमांनी कुटुंबियांशी संपर्क साधल्यानंतर कुटुंबाने मात्र वेगळाच आरोप केला आहे. या प्रकरणी आता महाविद्यालय प्रशासन आणि कुटुंबियांकडून माहिती घेऊन पोलीस सध्या चौकशी करत आहेत. या तरुणीने जर आत्महत्या केली असेल तर त्यामागचं कारण काय आहे आणि आत्महत्या नसेल तर ढकलून कुणी दिलं हे मोठं गूढ कायम आहे.