रात्रीपासूनच मुंबई आणि मुंबई उपनगरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अंधेरी, परळ, वांद्रे, बोरिवली, धारावी, सायन, वांद्रे आणि दादर येथील रस्ते पूर्णतः पाण्याने व्यापले होते. तर आज सोमवार, 16 जून रोजी सुद्धा सकाळी सकाळी पावसाने हजेरी लावायला सुरुवात केल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे कालपासूनच मुंबई आणि उपनगरात मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाश्यांची मोठी गैरसोय होतेय.
हवामान खात्याकडून आजच्या दिवसासाठी मुंबई शहरासह मुंबई उपनगर, ठाणे, पालघर परिसरात यलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.