बुलढाणा : नुकसानीचा बदला न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने भाजप आमदाराच्या घरावरच पेट्रोल कॅन घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांच्या घरावर शेतकऱ्याने या हल्ल्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे संजय कुटे यावेळी घरात उपस्थित होते. पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही न मिळाल्यामुळे हा शेतकरी हतबल झाला होता आणि या नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यावर्षी मे महिन्यातच पावसाने धुमाकूळ घातला आणि आता ऐनवेळी पावसाने दडी मारलीय. शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत, मात्र पेरणी करावी की नाही याबाबत अनिश्चितता आहे. या सगळ्या परिस्थितीत जे नुकसान झालं त्याचीही भरपाई मिळालेली नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आणि त्याने थेट आमदाराच्याच घरावर हल्ला करण्याचं पाऊल उचललं. मात्र वेळेवरच प्रसंगावधान राखल्यामुळे कुटेंच्या बंगल्यावर मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी पोलिसांनी शेतकरी विशाल मुरुख यांच्या विरुद्ध BNS 333 , 351(2) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी जळगाव जामोद पोलीस करत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शेगाव मतदारसंघाचे माजी मंत्री म्हणून आणि भाजपचे संकट मोचक म्हणून देखील संजय कुटे यांची ओळख आहे. 2004 पासून ते सलग विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येतात. यापूर्वी त्यांनी भाजपच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून देखील कामकाज पाहिलं आहे. या सर्व घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे अमरावती येथील बच्चू कडू यांचे आंदोलन, तर नुकतेच पुण्यात अजित दादा पवार यांच्या कार्यक्रमात प्रहार कार्यकर्त्यांनी केलेला राडा यामुळे आता सरकारच्या समोर एक मोठे आव्हान उभे राहत आहे.