टेसलाचं अख्खं मार्केट बीवायडीनं खाल्लंयं का?

टेसला

संपूर्ण भारत आणि जगात सध्या इलेक्ट्रिक वाहने वेगाने लोकप्रिय होताहेत आणि त्यामध्ये दोन प्रमुख जागतिक ब्रॅंडचं नाव घेतलं जातंय. ते दोन ब्रॅंड म्हणजे टेसला आणि बीवायडी. भारतात या दोन्ही जागतिक ब्रॅंडच्या गाड्यांची विक्री होतेय का? यात टेसलाचं अख्खं मार्केट बीवायडीनं खाल्लंयं असं का बोललं जातय आणि यामागचे कारण काय? दोन्ही कंपन्यांची भारतातील सध्यस्थिति काय? इलेक्ट्रिक वाहनाच्या बाबतीत अमेरिकन कंपनीपेक्षा चीनी कंपनीला भारतीय का पसंती देताहेत? सोबतच भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत काय धोरण राबवतयं?

शाश्वत आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला दिवसेंदिवस महत्व प्राप्त व्हायला सुरुवात झालीय. जागतिक स्तरावर सगळेच देश आपल्या वाहतूक साधनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यासाठी प्रयत्नशील असताना दिसताहेत. सध्या जगभरात दोन इलेक्ट्रिक गाड्यांच्या ब्रॅंडची जोरदार चर्चा सुरू असून त्यामध्ये एक अमेरिकन कंपनी टेसला तर दुसरी चायनीज कंपनी बीवायडी म्हणजेच बिल्ड युअर ड्रीम्स. जागतिक स्तरावरील हे दोन्ही ब्रॅंड भारतात आपलं मार्केट तयार करण्यासाठी कसून प्रयत्न करताना दिसताहेत पण यात सध्यातरी बीवायडीनं बाजी मारल्याचं दिसतयं. भारताच्या या आधुनिक इलेक्ट्रिक वाहनांच्या क्रांतीमध्ये जणूकाही दोन जागतिक कंपन्यांची स्पर्धाच लागल्याचे पाहायला मिळतयं. चीनी कंपनी असलेली बीवायडीनं सध्या तीचे चार मॉडेल्स भारतात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत ज्यामध्ये बीवायडी ऑटो ३ एसयूव्ही, बीवायडी सील सिडन, बीवायडी ई-मॅक्स ७ एमपीव्ही आणि बीवायडी सी लायन ७ एसयूव्ही चा समावेश होतो. या गाड्यांची भारतातील किंमत साधारणतः २४ लाख ९९ हजार ते ५४ लाख ९० हजार रुपयांपर्यंत असून त्या लोकांच्या पसंतीला पडताहेत. तर टेसला कंपनी तिचे प्रीमियम मॉडेल ३ आणि मॉडेल वाय लाँच करण्याच्या अजूनही तयारीतच असून ज्यांची किंमत सुमारे ३८ ते ४५ लाखांपासून सुरू होणं अपेक्षित असल्याचे सांगण्यात येतेयं. बीवायडीची भारतातील उपलब्धता आणि भारतीयांना परवडणारी टेसला पेक्षा कमी किंमत लोकांच्या पसंतीला येत असल्याचं सध्यातरी दिसत आहे. बीवायडीमध्ये जी बॅटरी वापरण्यात आली आहे ती ५५० ते ६०० किलोमीटर पर्यंत चालू शकते आणि ४५० किलोमीटर गाडी चालण्यासाठी जेवढी ऊर्जा लागते तेवढी चार्जजिंग ५ मिनिटात तिच्या विशेष चार्जरनं होते. तर टेसला एकदा चार्ज केल्यास ६०० पेक्षा जास्त किलोमीटर चालू शकते तर तिच्या बॅटरीची चार्जजिंग करण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो बीवायडी पेक्षा जास्त आहे. टेसला ही तिच्या आतील आणि बाहेरील डिझाईनमुळं जास्त आकर्षित दिसते तर बीवायडी ही प्रॉपर भारतीय रस्त्यांवर चालू शकेल अशी तयार केलीय. BYD ही २००७ पासून भारतात काम करत असून ती १० पेक्षा अधिक शहरांमध्ये कार्यरत तर आहेच पण आता ती हैदराबादमध्ये ८५,००० कोटी रुपयांचा कारखाना उभारण्याची योजना बनवीत असल्याचे बोलले जातंय. बीवायडीच्या किंमती स्थानिक उत्पादनामुळे कमी होतील तर टेस्ला आयातीवर अवलंबून असल्यामुळे अमेरिकन टेरिफचा सामना करावा लागू शकतो. यामुळेच भारताचं जे मार्केट टेसला घेणार होतं ते BYD नं सध्यातरी कॅप्चर केल्याचं दिसतयं. २०२४ मधील आकडेवारी नुसार BYD ने जागतिक स्तरावर टेस्लाच्या १ लाख ७९ दशलक्ष वाहनांना मागे टाकून ४ लाख २७ दशलक्ष वाहने विकलीत. यावरून आपल्याला जागतिक मार्केटचा अंदाज येऊ शकतो. सध्या या दोन जागतिक ब्रॅंडमध्ये किंमत आणि नाविन्यता यामध्ये एकप्रकारे छुपे युद्धचं सुरू आहे ज्यात अमेरिकन कंपनी पेक्षा चीनी कंपनी BYD भारतात बाजी मारताना दिसतेय.

दरम्यान या सगळ्यात भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन इलेक्ट्रिक वाहने खरेदी करायला प्रोत्साहन देताना पाहायला मिळतयं. नुकतेच महाराष्ट्र सरकारनं आपले महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण अर्थात ईव्ही धोरण 2025 जाहीर केलंय जे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2030 पर्यंत प्रभावीपणे लागू असेल. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे, उत्सर्जन कमी करणे आणि महाराष्ट्राला भारतातील अग्रगण्य EV केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट या धोरणात ठेवण्यात आलय. २०२१ ते २०२५ काळात राबविण्यात आलेलं धोरणं ९३० कोटी होतं आणि आता जे २०२५ ते २०३० साठी जाहीर करण्यात आलंय ते १९९३ कोटींचे असेल. महाराष्ट्रात 2030 पर्यंत खरेदी करण्यात येणाऱ्या नवीन वाहन नोंदणींपैकी 30% वाहने इलेक्ट्रिक असतील यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. याशिवाय 2030 पर्यंत जे शहरात वापरण्यात येतात ती 50% फ्लीट वाहने इलेक्ट्रिक असावीत, 2030 पर्यंत PM2.5 चे सुमारे 325 टन आणि हरितगृह वायूचे 1 दशलक्ष टन उत्सर्जन कमी करणे, EV उत्पादन, बॅटरी पुनर्चक्रण आणि तंत्रज्ञान संशोधनाला चालना देण्याबरोबर शहरी, अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागात चार्जिंग पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेय. तर ही इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी १० ते १५ टक्के सूट आणि अनुदान, मोटर वाहन कर, नोंदणी शुल्क १०० टक्के माफ असणार असून विशेष म्हणजे टोलमध्ये मोठी सवलत देण्यात आलीय. ज्यामध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर या इलेक्ट्रिक चारचाकी आणि बससाठी 100% टोल सूट तर इतर राज्य महामार्गांवर 50% सवलत मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आलंय. यामुळं आगामी काळात आपल्याला महाराष्ट्रातील रस्त्यांवर अनेक इलेक्ट्रिक वाहनं दिसतील.

एकंदरीत महाराष्ट्र शासन असो की वरती भारत सरकार भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत अजूनही सवलती देऊन पर्यावरणपूरक पर्याय अवलंबिताना दिसेल त्यामुळं लोकांनाही ev कार वापराला प्राधान्य द्यायला सुरुवात करावी लागणार. पण या सगळ्यात सध्या भारतात ज्या दोन जागतिक ब्रॅंडची स्पर्धा लागलीय त्यात पुढील काळात अधिक तीव्रता वाढलेली दिसेल. आजघडीला तरी भारतात टेसला पेक्षा BYD नं जास्त मार्केट कॅप्चर केल्याचे दिसतय. यावरून असं लक्षात येतं की, भारतीय अमेरिकन कंपनी पेक्षा चीनी कंपनीला तिच्या किंमतीवरुनं प्राधान्य देतात. तुम्हाला काय वाटतं कोणती जागतिक कंपनी इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात अग्रेसर आहे? कमेन्ट करून जरूर सांगा आणि माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *